
राज्यात एकाच दिवशी अपघातांच्या अनेक गंभीर घटनांची नोंद झाली आहे. नाशिक, गोंदिया, मुंबई, वसई आणि नांदेडसह विविध भागांत अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या द्वारका सर्कलवर रात्रीच्या वेळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील एका ट्रॅव्हल बसच्या चाकाखाली चिरडून एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रॅव्हल बसचा चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. द्वारका सर्कलवर रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल बसची मोठी वर्दळ असते. याच दरम्यान हा अपघात घडला.
गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 वर आमगाव जवळील ठाणा या गावी रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीवरील दोन युवकांना जोरदार धडक दिली. या धडकेत कारंजा, गोंदिया येथील सुरेश भोयर आणि राऊत या दोन्ही युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या आमगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने समोर जाणाऱ्या एसटी बस, टेम्पो ट्रॅव्हल्स आणि एका कारला धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. अपघाताची तीव्रता खूप जास्त होती. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गारगोटीहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसमधील सर्व 15 प्रवासी सुखरूप आहेत. अपघात होताच कंटेनरचा चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मुंबईतील ओशिवरा येथे आदर्श नगर सिग्नलजवळ आज दुपारी गोराईहून सांताक्रूझकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगाच्या बेस्ट बसने टेम्पो रिक्षासह चार ते पाच वाहनांना धडक दिली. या घटनेत ५ ते ६ स्थानिक लोक जखमी झाले. मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. बसचा चालक नशेत असल्यासारखा वाटत होता, असे जखमींना मदत करणाऱ्या संदेश देसाई यांनी सांगितले. यामुळे चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाच्या अति हौशीपणामुळे ही कार किनाऱ्यावर तयार केलेला चौथरा तोडून थेट खाली कोसळली. या घटनेत जीवितहानी टळली असली, तरी चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. स्थानिकांनी तात्काळ मदत करत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढली.
नांदेड-लोहा रस्त्यावरील कारेगावजवळ एक दुर्दैवी घटना घडली. लोखंडी शिडी घेऊन जात असताना, रस्त्याच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेचा शिडीला स्पर्श झाला. शिडीमध्ये विद्युत प्रवाह उतरून एका कामगाराचा अक्षरशः जळून कोळसा झाला. सीडीला विद्युत प्रवाह उतरताच दोन कामगार बाजूला फेकले गेले, मात्र एक कामगार शिडीलाच चिटकला. त्याला वाचवण्यासाठी लाकूड किंवा इतर साहित्य उपलब्ध नसल्याने उपस्थितांना बघण्याशिवाय पर्याय उरला नाही. यातच त्या कामगाराचा मृत्यू झाला.