महाराष्ट्रासाठी पुढील 72 तास महत्त्वाचे, थंडी वाढणार की पाऊस पडणार? तुमच्या जिल्ह्याचा अंदाज काय?
महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र झाली असून धुळ्यात पारा ५ अंशांवर घसरला आहे. मुंबईत दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या हवामानात सध्या टोकाची विविधता पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे राज्यात बोचरी थंडी सक्रिय झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र अक्षरशः गारठला आहे. तर दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. एकीकडे थंडीची लाट, दुसरीकडे दाट धुक्याची चादर आणि तिसरीकडे ढगाळ हवामान अशा तिहेरी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठा परिणाम जनजीवनासह शेतीवर होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट तीव्र झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे आणि नाशिक (निफाड) जिल्ह्यात होत आहे. धुळ्यात पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. विदर्भातही थंडीचा जोर वाढला असून नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांत आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत थंडीपेक्षा धुक्याचा प्रभाव जास्त
मुंबईत थंडीपेक्षा धुक्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पहाटेच्या वेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, नवी मुंबई आणि कोस्टल रोड परिसरात दाट धुक्यामुळे दृश्यमानता (Visibility) कमालीची घटली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहनचालकांना जपून गाडी चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईची हवा अतिशय वाईट (AQI २२०+) श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यात रात्रीचा गारवा असला तरी दिवसा कडक ऊन पडत आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दक्षिण कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि कोल्हापूर परिसरात ढगाळ हवामानामुळे हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. धुके आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे द्राक्षे तडकण्याची आणि आंब्याच्या मोहरावर करपा किंवा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच थंडीचा गहू आणि हरभऱ्याला फायदा होत असला तरी, ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात शीत लहरीचा (Cold Wave) प्रभाव कायम राहील. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान स्थिर राहील, मात्र धुक्याचे प्रमाण वाढू शकते.