भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह धो-धो… झाडेही कोसळली; राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं

Heavy Rain in Maharashtra : राज्यातील हवामानात मोठा बदल होताना पहायला मिळत आहे. काही ठिकाणी सूर्य आग ओकत आहे तर काही ठिकाणी पावसाचा कहर पहायला मिळत आहे.

भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह धो-धो... झाडेही कोसळली; राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं
unseasonal rain
Image Credit source: Google
| Updated on: May 06, 2026 | 7:53 PM

गेल्या काही काळापासून राज्यातील हवामानात मोठा बदल होताना पहायला मिळत आहे. काही ठिकाणी सूर्य आग ओकत आहे तर काही ठिकाणी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज पुणे जिल्ह्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच शेतमालाचेही नुकसान झाले. राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात.

राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे राजगड तालुक्याला जोडणाऱ्या वेल्हे – नसरापूर या मुख्यमार्गावर अडवली गावाच्या हद्दीत झाड कोसळल्याची घटना घडली. रस्त्याच्या मध्येच झाड पडल्याने सुमारे अर्धा तास या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. अडवली गावचे माजी सरपंच मोहन काटकर यांनी पुढाकार घेऊन मदत कार्य करत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे सुमारे अर्ध्या तासानंतर या मार्गावरची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली. मात्र या अवकाळी पावसाचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना बसल्याच्या पाहायला मिळालं.

नाशिक-अमरावतीतही पावसाच्या सरी

नाशिकच्या इगतपुरीतही आज पावसाने हजेरी लावली. पंधरा ते 20 मिनिटे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सकाळपासून उकडा जाणवत होता, त्यामुळे पावसामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आता पुढील दोन ते तीन दिवस काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.

भंडाऱ्यात अवकाळीची हजेरी

आज सलग दुसऱ्या दिवशीही भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचा फटका रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या धान पिकांना बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धानपीक जमीनदोस्त झाले असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे.

जळगावात शेतमालाचे नुकसान

जळगावच्या धरणगाव तालुक्यात पाळधी सह अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे उकाळ्याच्या त्रासापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसाने मका ज्वारीसह काढणीला आलेल्या इतर पिकांबरोबरच फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Follow Us