Chhagan Bhujbal: महामंडळांवरील नियुक्त्यांचा मुहूर्त ठरला! छगन भुजबळांनी दिली मोठी अपडेट, थेट तारीखच सांगितली, हालचालींना वेग
Maharashtra Corporation Appointments Date: सत्तेत वाटा मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे. महायुतीत महामंडळ नियुक्त्यांसाठी हालचालींना वेग आला आहे.

महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात होणारी वक्तव्यं आणि टीका यांना आळा घालण्यासाठी आता समन्वय समितीने कठोर भूमिका घेतली आहे. महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या आमदाराने, मंत्र्याने किंवा पदाधिकाऱ्याने एकमेकांविरोधात वावगं भाष्य करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात चुकीची वक्तव्यं किंवा आरोप करणाऱ्यांचा तिन्ही पक्ष एकत्र येऊन मुकाबला करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री दादा भुसे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मदत, महामंडळांच्या नियुक्त्या, जिल्हा नियोजन समित्या आणि महायुतीतील अंतर्गत समन्वय या विषयांवर चर्चा झाली.
बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात कोणतेही वावगे भाष्य करू नये. एखाद्या नेत्याला किंवा आमदाराला काही अडचणी असतील, तर त्यांनी त्या मुख्यमंत्री किंवा आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मांडाव्यात. माध्यमांमध्ये एकमेकांविरोधात वक्तव्य करण्यापेक्षा पक्षांतर्गत चर्चा करून प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात चुकीची वक्तव्यं केली जात असतील किंवा आरोप होत असतील, तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतील. मर्यादा सोडून कोणी बोलत असेल, तर त्याला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते पार पाडतील. लोकशाहीच्या नावाखाली सगळंच खपवून घेतलं जाईल असं नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. महामंडळांच्या माध्यमातून अनेक विकासकामं आणि लोकहिताची कामं करता येऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त सभासदांची नियुक्ती 15 डिसेंबरपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत घोडं अडलेलं नाही, असं म्हणत त्यांनी नियुक्त्यांबाबत सकारात्मक संकेत दिले.
तसंच जिल्हा नियोजन समित्यांच्या स्थापनेसाठी लवकरात लवकर नावं देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. डीपीडीपीसंदर्भातील कामांनाही गती देण्यात येणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहे. त्यावर संबंधित नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी हा बैठकीतील महत्त्वाचा विषय होता.
मनरेगाच्या माध्यमातून कामं उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामं हाती घेणे आणि शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना अग्रीम मदतीची रक्कम मिळाली नसेल, तर ती अडचण तातडीने दूर करावी. मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी प्रशासनाने काम करावं. या प्रक्रियेत लोकसहभागही महत्त्वाचा असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
