MLC Election 2026 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा वाढला, एकनाथ शिंदेंचा 11-4-2 चा फॉर्म्युल्यासाठी नकार, आता अमित शाह…

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत वाद पेटला आहे. भाजपचा फॉर्म्युला नाकारत एकनाथ शिंदे थेट अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीला पोहोचले आहेत.

MLC Election 2026 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा वाढला, एकनाथ शिंदेंचा 11-4-2 चा फॉर्म्युल्यासाठी नकार, आता अमित शाह...
Eknath Shinde Amit Shah
| Updated on: May 27, 2026 | 11:10 AM

महाराष्ट्रात लवकरच १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीची घोषणा होताच आता सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. भाजपने निश्चित केलेला जागावाटप फॉर्म्युला शिवसेनेला शिंदे गट पूर्णपणे अमान्य असल्याचे समोर आले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी या विषयावर थेट चर्चा करून आपली भूमिका मांडणार आहेत.

शिवसेनेची नाराजी

शिवसेनेतील काही मंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी बंडखोरी करत भाजपसोबत वेगळी चूल मांडली होती. यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते. मात्र आता शिंदे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतरही जागावाटपात आणि सत्तेत शिवसेनेला दुय्यम स्थान दिले जात आहे, असे बोललं जात आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला सर्वात कमी वाटा दिला जात असल्याचा सूर आहे. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेतून सर्वाधिक जागांवर दावा करत असून, शिवसेनेच्या पारंपारिक आणि हक्काच्या जागांवरही हक्क सांगत असल्यामुळे शिंदे गटात तीव्र नाराजी आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युलात भाजपने स्वतःकडे ११ जागा ठेवून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गटाला २ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जो एकनाथ शिंदे यांनी साफ फेटाळून लावला आहे. शिवसेनेने किमान ६ ते ७ जागांची मागणी लावून धरली आहे.

जागावाटपाचा सद्यस्थितीतील तिढा

सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला केवळ ४ जागा येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे (एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला), नाशिक, यवतमाळ आणि परभणी या जागांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि अहिल्यानगर (अहमदनगर) या जागा देण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातही पुणे आणि इतर जागांवरून धुसफूस सुरू आहे.

तर भाजपने राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपल्या बळाचा हवाला देत तब्बल १२ जागांवर हक्क सांगितला आहे. यामध्ये नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-संगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

दरम्यान या जागावाटपाच्या तिढ्यावरून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक मरेथॉन बैठक अनिर्णित राहिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाह यांच्या मध्यस्थीची मागणी केली आहे. विशेषतः ठाणे आणि नाशिक या जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असून, तिथून कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची रणनीती एकनाथ शिंदेंनी आखली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील या हाय-प्रोफाइल भेटीनंतर अमित शाह कोणता तोडगा काढतात आणि महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Follow Us