निवडणूक तोंडावर पण उमेदवार ठरेना, महायुतीचा 9 तर मविआचा 13 जागांवर तिढा

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाचा तिढा काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक अवघी तोंडावर आली आहे, लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे, पण अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरताना दिसत नाहीत.

निवडणूक तोंडावर पण उमेदवार ठरेना, महायुतीचा 9 तर मविआचा 13 जागांवर तिढा
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Edited By: | Updated on: Apr 02, 2024 | 11:52 AM

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आता 8 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा काळ उलटला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात जागावाटप आणि उमेदवार ठरवण्यासाठी सुरु असलेल्या बैठका काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. महायुतीचे अजूनही 9 जागांवरचे उमेदवार ठरलेले नाहीत. तर महाविकास आघाडीचे 13 जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे 18 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यासाठी फक्त 25 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. प्रचारसभा, शक्ती प्रदर्शन हे तर फार लांब आहेत, अजून उमेदवारच ठरताना दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर त्यांनी आतापर्यंत वंचितच्या 19 उमेदवारांची यादीदेखील जाहीर केलीय. पण महाविकास आघाडीचे 13 जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाही. याउलट महाविकास आघाडीत काही मतदारसंघावर दोन-दोन पक्षांचा दावा केला जातोय.

विशेष म्हणजे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत. पण भाजपकडून सध्या तरी या मतदारसंघासाठी कुणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीकडून मुंबई दक्षिणच्या जागेबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तर महाविकास आघाडीकडून सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत. महायुतीत पालघर, कल्याण, ठाणे, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग, संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. या जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. विशेष म्हणजे कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. पण तरीदेखील त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही.

मविआचा 13 जागांवर तिढा सुटेना

महाविकास आघाडीच्या तिढा हा खूप किचकट मानला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचा तब्बल 13 जागांवरचा तिढा कायम आहे. या 13 जागांवर महाविकास आघाडीवा उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. यापैकी हातकणंगलेची जागा ठाकरे गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा होती. पण यानंतर याबाबत कोणतीच माहिती समोर येऊ शकली नाही. याशिवाय धुळे, जळगाव, रावेर, अकोला, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण, जालना, बीड, माढा या जागांवर महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्यासारखी स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महायुतीचा ‘या’ जागांवर उमेदवार ठरेना

  • 1) मुंबई उत्तर मध्य
  • 2) मुंबई दक्षिण
  • 3) पालघर
  • 4) कल्याण
  • 5) ठाणे
  • 6) धाराशिव
  • 7) रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  • 8) संभाजीनगर
  • 9) नाशिक

मविआचा ‘या’ जागांवर उमेदवार ठरेना

  • 1) धुळे
  • 2) जळगाव
  • 3) रावेर
  • 4) अकोला
  • 5) मुंबई उत्तर
  • 6) मुंबई उत्तर मध्य
  • 7) पालघर
  • 8) भिवंडी
  • 9) कल्याण
  • 10) जालना
  • 11) बीड
  • 12) माढा
  • 13) हातकणंगले