माळशिरसमधील 8 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…
Malshiras Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये एक भीषण अपघात झाला. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच स्थानिकांनी अनेकांचा जीव वाचवला आहे. या घटनेनंतर आता प्रसासनाला जाग आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींचा सर्वे होणार – जिल्हाधिकारी
माळशिरसमधील अपघातावर बोलताना सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी म्हटले की, ‘ग्रामस्थांनी विहिरीत उतरुन लोकांचा जीव वाचवला. वाहनात एकूण 15 लोक होते, त्यापैकी 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. या विहिरीच्या बाजूला संरंक्षण भिंत बांधणं अपेक्षित होतं. आता संपूर्ण जिल्ह्यात रोडच्या बाजूला असलेल्या विहिरींचा सर्वे केला जाणार आहे.’ पुढे बोलताना कार्तिकेयन यांनी म्हटले की, खासगी वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणं चुकीचं आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात भरणंही चुकीचं आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार आहोत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जानकर
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले की, ‘शेतकऱ्यांच्या विहिरी अधीपासूनच्या आहेत, रस्ता नंतर बनला. रस्ता बांधतांना सर्वे झाला नाही का? रस्त्याचा पुन्हा सर्वे केला पाहिजे. MSRDC आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून विधानसभेतही मुद्दा मांडणार आहे. संपूर्ण रस्ताच धोकादायक आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांचे मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तसेच जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे.