मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मराठा बांधवांना थेट तयारीला लागण्याचा आदेश; आता नवी मोहीम

मनोज जरांगे यांनी मुंबईतील उपोषणानंतर आता नवी घोषणा केली आहे. ही घोषणा करून त्यांनी संपूर्ण मराठा बांधवांना एक महत्त्वाचे आावहन केले आहे. मराठा समाजाने तयारी लागा, असेही ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मराठा बांधवांना थेट तयारीला लागण्याचा आदेश; आता नवी मोहीम
manoj jarange patil
| Updated on: Sep 08, 2025 | 6:15 PM

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत जाऊन पाच दिवस उपोषण केले. या उपोषणादरम्यान त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधून थेट मुंबईत धडकले होते. अपेक्षेपेक्षा जास्त आंदोलक मुंबईत गेल्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबई बंद पडली होती. प्रमुख रस्त्यांवर मराठा मोर्चेकरी दिसत होते. त्यानंतर सरकारनेही नमते घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला. मराठ्यांचा हा मोठा विजय असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, आता हे उपोषण यशस्वी झाल्यानंतर आता जरांगे यांनी मराठा बांधवांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यांनी समस्त मराठा बांधवांना तयारीला लागा असा आदेशही देऊन टाकला आहे.

नेमकी काय घोषणा केली आहे?

मनोज जरांगे यांनी आज नारायण गडाला भेट दिली. यावेळी गुलाल उधळीत त्यांचे स्वागत करण्यात आले. गडावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठा समाजाच्या लेकरांचे कल्याण होणार आहे, असे सांगितले. तसेच आमचा यावेळी दसरा मेळावा होणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी मराठा बांधवांना जोमात तयारी लागा आणि दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने या असेही आवाहन केले.

100 टक्के दसरा मेळावा करायचा

या वर्षी दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी आता फारसा वेळ नाही. मागच्या वर्षी आपल्याकडे वेळ होता. त्यामुळे मैदान साफ करता आले. या वर्षी मात्र फारसा वेळ नसल्याने जो छोटा-मोठा दसरा मेळावा होईल त्याची तयारी केली जाईल, असेही यावेळी जरांगे यांनी सांगितले. परंपरेनुसार आपण दसरा मेळावा 100 टक्के करायचा. तिथूनच सरकारला तुम्ही काय दिलं नाही आणि आम्ही तुमच्याकडून कसे घेतो हे सांगू, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला यावेळी दिला.

संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार

पुढे बोलताना त्यांनी सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर भाष्य केले. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण मराठवाड्यातील मराठा हा आरक्षणात जाणार आहे. या निर्णयामुळे मराठ्यांचा फायदा होणार आहे. मी खचणार नाही. काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला मी तयार आहे. सरकारचे काही चुकले तर सुधारित जीआर काढावा लागेल, असे आम्ही तेव्हाच कबूल करून घेतले होते, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.