
सिंधुदुर्गातील मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. राजकोट किल्ल्यावर जात लोक पाहणी करत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील राजकोट किल्ल्यावर जात घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मनोज जरांगेंनी एक शंका उपस्थित केली. वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. असं सरकार म्हणतंय. पण मग पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला? अशी शंका मनोज जरांगे यांनी उपस्थित केली आहे.
पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला? यात राजकारण होऊ नये, याची सरकारने याची चौकशी केली पाहिजे. कायद्यामध्ये बदल केला पाहिजे आणि कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरला सोडलं गेलं नाही पाहिजे. तो आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे. सरकारचा महापुरुषांच्या स्मारकाबद्दल बारीक वॉच असला पाहिजे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बघतो आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शहाणे आहात. पण छत्रपतींच्या जीवावर कुणीही राजकारण करू नका, असं मनोज जरांगे म्हणाले.
जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे. तुम्ही उघडे पडायला लागला आहात. इथे भांडण झाली ती फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी… छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे. यांना दुःखच नाही आहे, त्यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राळे केली नसते. या घटनेच्या मुळाशी गेले असते, इथे स्मारक सुद्धा उभा राहणं गरजेचं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
वेळ लागला तरी चालेल पण इथे शिवरायांचं दर्जेदार स्मारक व्हावं. प्रचंड मोठं स्मारक व्हावं पण ते टिकाऊ व्हावं. मला या जागेवर राजकारण करायचं नाही. या देशातल्या प्रत्येकाच्या भावन दुखावले आहेत. इथे पुतळ्याचे राजकारण करू नका. तुम्ही दोघेही आंदोलन करून हे प्रकरण जिरव असं वाटत असेल. मात्र तसं होणार नाही महाराष्ट्राची जनता अजून आहे. छत्रपतींच्या नावावरती तुम्ही सत्ता उपभोगू नका, असं म्हणत मनोज जरांगेंनी राजकीय मंडळींवर निशाणा साधला आहे.