
मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी धनगर आरक्षणावरही भाष्य केलं आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मनोज जरांगे पाटलांनी आंदोलकांनी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका. सरकार आडमुठात घुसले की मराठेही आडमुठात घुसतील असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी धनगर आरक्षणावर बोलताना म्हटले की, ‘देवेंद्र फडणवीस आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवत आहेत, त्यांनी त्यांचे कर्तृत्व काय आहे ते सांगावं. फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि अजून आरक्षण दिलं नाही. कैकाडी समाज पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, तर मराठवाड्यात ओबीसीमध्ये आहे. काही ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज तीन प्रवर्गात आहे हे फडणवीसांचे कर्तृत्व. मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे तुमचं कर्तृत्व. शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचा कर्तृत्व’ असं जरांगेंनी म्हटलं आहे.
आंदोलनाच्या परवानगीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. माझं एक मत आहे की असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा डाव खेळावा. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मरेपर्यंत मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. एक-एक दिवस मदुतवाढ देण्यापेक्षा थेट आरक्षण देऊन टाकावे, असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.