
Manoj Jarange Mumbai Morcha LIVE Updates in Marathi: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या प्रमुख मागणीचा ध्यास धरत सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मराठी समाजाच्या आरक्षणासाठी ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं आहे. कोर्टाने जरांगे यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती, मात्र पोलिसांनी काही अटी घालून त्यांनी फक्त एक दिवस आंदोलनाची परवानगी दिली. पण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करणारच असे म्हणत मनोज जरांगे पाटील हे मात्र आंदोलनावर ठाम असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे संपूर्ण आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारचं त्यावर काय उत्तर असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाबद्दलचे सर्व अपडेट्स वेळोवेळी आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून देत राहणार आहोत, दिवसभर फॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग…
आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारंचं फिरणं मुश्किल होईल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन निशाणा साधला आहे. “सरकारकडून वेळकाढूपणा सुरु आहे. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधवांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे. कायम सर्वांनी शांतता ठेवा, असं जरांगे पाटील आंदोलकांना उद्देशून म्हणाले.
आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यात नेतृत्वात मराठा आंदोलकांकडून हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाचा आजचा (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी केली जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जरांगे पाटल्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आडमुठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही, चर्चेतून निर्णय होतो. कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल. कोर्टाच्या निर्णयांचा अवमान करुन चालणार नाही. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अधिवेशन बोलवून निर्णय घ्या, याबाबतचे बिल पास करा आणि आरक्षण देऊन टाका. आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, मात्र ते आमच्यावर टीका करत आहेत. आज त्याच्याकडे 250 आमदार आहेत, ते चुटकीसरशी निर्णय घेऊ शकतात. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना बहुमत दिले आहे, त्यांनी आता निर्णय घ्यावा.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. तसेच एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.
आझाद मैदानात आंदोलनासाठी गेलेल्या विजय घोगरे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता आज त्याचा मृतदेह लातूर जिल्ह्यातल्या टाकळगावकडे पाठविण्यात आला आहे,
अहमदपूर इथ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सध्या विजय घोगरे यांचा मृतदेह अँब्युलन्स मध्ये ठेवण्यात आला आहे.
पुणे – खेड तालुक्यातून पाच कंटेनर आणि सात पिकअप गाड्याभरून लाखो लोकांचा शिधा घेऊन मुंबईच्या दिशेने मराठा बांधव निघाले आहेत.
पुण्यातील कोंढवा परिसरातील मुस्लिम बांधव मराठा आंदोलनास पाठिंबा देत आहेत. आंदोलनकाच्या सेवेसाठी मुस्लिम बांधव अन्नधान्य घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास मुस्लिम बांधवांचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणावर आक्षेप घेत ओबीसी समाज बांधवांची कल्याण डोंबिवलीत महत्त्वाची बैठक पार पडली. आमचे आरक्षण हिसकावून देणार नाही. वेळ पडल्यास ५५ टक्के समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी समाजाने दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन सामोपचाराने तोडगा काढण्याची गरज आहे. शरद पवार यांनी सुचवलेला पर्याय चुकीचा आहे, ती राजकीय भूमिका मांडत आहेत. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येणार नाही. घटनादुरुस्ती करून 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण दिल्यास ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊ शकते. राज्य सरकारने आता जर कुठला कायदा केला तर घटनात्मक तो टिकणार नाही. मराठा समाजात सरसकट मागासले पण नाही असे घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शेकडो समाज बांधवांना घेऊन उपोषणाला बसलेले आहेत.एकीकडे मराठा आंदोलक जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली. शहराच्या विविध भागात ही बॅनरबाजी करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि कार्य अशा आशयाचे हे बॅनर लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात भाजप पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावले आहेत. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपाची बॅनरबाजी दिसून आली. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा बॅनरवर उल्लेख आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा मुख्यमंत्री म्हणून बॅनरवर उल्लेख आहे
राजकारणी लोकं नासके असतात. आमदार मंत्री नासके असतात. समजून सांगितलं पाहिजे आरक्षण कसं द्यायचं. मग दोन वर्ष तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला म्हशी भादरायला ठेवलं का. तुम्हाला आंतरवालीत सांगितलं ना. दोन वर्षापासून सर्वाना सांगितलं. हे लोकं ना नीच आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
तृतीय पंथीयांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची मनोभावे पूजा अर्चना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आजच्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना देण्यात आला.
मुख्यमंत्री असताना दरेगावल जाणे, ही चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिलेले आहे. जेव्हा कुणी काही ऐकत नाही किंवा पळ काढायचा तेव्हा त्याचे शेतीतील फोटो व्हायरल होतात. मात्र मागच्या वेळी आंदोलकांना आपण काय आश्वासन दिले होते. ते त्यांनी स्पष्ट करावे, आम्हालाही आठवण करून द्यावीशी वाटते.आपण छत्रपतींची शपथ घेऊन सांगितले होते की आपण मराठ्यांना आरक्षण देऊ, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
मला याच्यावर काही कॉमेंट करायची नाही. मला याच्यावर काही भाष्य करायचं नाही.जाऊ द्या…म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी मराठा आरक्षण बाबत बोलने टाळलं.
“चंद्रकांतदादांना म्हणा मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. इथून पुढे बोलू नका. या चंद्रकांत पाटलांनीच मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून व्हॅलिडिटी रोखली होती. त्यामुळे वचवच करू नका. तू जास्त लांब नाही. कोल्हापूरलाच आहे. राजघराण्याच्या भागातच आहे. चंद्रकांत पाटील लैच लांब जायला लागलेत,” अशी टीका मनोज जरांगेंनी केली.
अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री गिरीश महाजन, मंत्री मकरंद पाटील तर इतर सदस्य ऑनलाईन बैठकीत सहभागी…. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचे सदस्य देखील उपस्थित…
“काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही. हे लय भंगार आहेत. नुसत्या बैठका घेत आहेत. लय झाल्या बैठका,” असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऍडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला… मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलनाचा तिसरा दिवस… आझाद मैदानातील आंदोलनास परवागनी न देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती…. पोलीस गाडीसह अनेक कर्मचारी टॉवरखाली थांबले आहेत…
कल्याण पश्चिम परिसरातील निक्की नगर परिसरात भरधाव कारची डिव्हायडरला धडक… गाडी पलटली, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही… कार मधील व्यक्ती किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती… कार उलटल्यानंतर रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी मिळून उलटलेली कार सरळ करत सोडवली वाहतूक कोंडी… सध्या खडकपाडा पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी 11 वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची पुन्हा बैठक होणार आहे. काल रात्री उशिरा न्यायमूर्ती शिंदे आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या सचिवांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केलेल्या चर्चेचा सारांश विखे पाटील यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर विखे पाटील यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. या पार्श्वभूमीवर आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधून अन्नसामग्री आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली आहे. आंदोलकांचे हाल होऊ नयेत यासाठी, कळंबमधील नागरिकांनी ‘एक घर दोन भाकरी’ या सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत, घरोघरी थापलेल्या भाकरी, कांदा-चटणी, बिस्किटे आणि औषधे गोळा केली. ही सर्व सामग्री घेऊन तीन मालवाहू वाहने मुंबईकडे रवाना झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी या उद्देशाने ही मदत पुरवण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलकांचा मुंबईच्या दिशेने सुरू असलेला प्रवास पोलिसांनी रोखला आहे. मुंबईत प्रवेशाला परवानगी नसल्यामुळे ठाण्यातील आनंद नगर टोल नाक्याजवळ पोलिसांनी आंदोलकांना थांबवले आहे. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे आंदोलकांमध्ये आक्रमकता दिसून येत आहे. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांना पाणी आणि खाण्याच्या वस्तू पोहोचवण्यासही अडथळे येत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अनेक आंदोलक शहरात मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने लावून चहा-नाश्ता तयार करत आहेत. स्वतःची सोय केल्यानंतर हे सर्व मराठा बांधव पुन्हा एकदा आझाद मैदानाच्या दिशेने जात आहेत. आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने शहरात विविध ठिकाणी आंदोलक एकत्र येताना दिसत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आझाद मैदानाच्या परिसरात मुक्काम केलेल्या आंदोलकांनी आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आलेल्या टँकरच्या खाली बसून रस्त्यावरच आंघोळी केल्या. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे, स्वच्छतागृहे आणि पाण्याची सोय अपुरी पडत असल्याने आंदोलकांना अशाप्रकारे व्यवस्था करावी लागली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा रेल्वे सेवक संघटनेने मराठा आंदोलकांसाठी आचारसंहितेचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर आंदोलनादरम्यान पाळायच्या १३ ते १४ सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये आंदोलकांनी शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती फोटो किंवा सेल्फीसाठी अनावश्यक गर्दी करू नये, अशा प्रमुख सूचनांचा समावेश आहे. या सूचनांचा उद्देश आंदोलन शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावे हा आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी तिसर्या दिवशीही (31 ऑगस्ट) परवानगी दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी विलेपार्ले राजाला भेट दिली. यावेळेस त्यांनी दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केला.
“एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले आहे आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत येतात हे किती दुःखद आहे. मनोज जरांगे पाटील यांना वारंवार आश्वासने दिली जात आहेत, पण ती पूर्ण केली जात नाहीत. यावरून सरकार खोट्याच्या पायावर उभं असल्याचं दिसून येतं. मोठे नेते मुंबईत येऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा राग त्यांना सहन करावा लागेल”, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
सकल मराठा समाजाकडून हिंगोलीत रविवारी रास्ता रोको करण्यात येणार आहे. नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर घोळवा शिवारात मराठा समाजाच्या बांधवांकडून रास्ता रोको करण्या येणार आहे. मुंबईत मराठा बांधवांची गैरसोय होत असल्याने सरकारच्या निषेधार्थ सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत असे एकूण 3 तास रस्ता रोको आंदोलन होणार आहे.
तामिळनाडूमध्ये 72% पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे हे विधान शरद पवार यांनी केलं होतं यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 ते 2022 साली महाराष्ट्रात होते. त्यावेळी पवार साहेबांनी त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला? असं देसाई यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत बोलतामा लक्ष्मण हाके म्हाले की, महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असे सांगितले आहे. सर्वपक्षीय आमदार खासदार उघडपणे भूमिका घेत आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत भीती वाटत आहे असुरक्षिततेची भावना आहे.
मराठा आंदोलकांना त्रास दिला जास असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आंदोलन कुठलंही असो पण आंदोलकांना दुश्मन समजू नये, आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतात. पण तुम्ही तिथे हॉटेल बंद करून टाकली चहापाण्याची व्यवस्था बंद करून टाकली ही तर मोगलशाही झाली. हे व्यवस्थितपणे हाताळले गेले पाहिजे, ते कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांनी ते दाखवलं पाहिजे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. सरकारला आणि मंत्री समितीला अधिकार आहेत. सरकार आणि महापालिका मोर्चाकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने मराठ्यांची व्यवस्था करायला हवी. मुंबईकरांनी मदत करायला पाहिजे.
मुंबई- गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल,
जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केल्याची माहिती
राधाकृष्ण विखे पाटील घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
विखे पाटील मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष
शिंदे समितीसोबत झालेल्या चर्चेचा वृत्तांत विखे पाटील फडणवीसांना सांगणार
मराठा आंदोलकांकडून जहांगीर आर्ट गॅलरीत जोरदार घोषणाबाजी
दर्शनी भागातील जागेत जात मांडला ठिय्या
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देण्यास विरोध दर्शवण्यासाठी आता ओबीसी संघटनांनी आरक्षण बचावाचा नारा दिला आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडल्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात देखील ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 तारखेपासून अंतरवाली सराठीमध्येच ओबीसी बांधव साखळी उपोषणाला बसणार असून या संदर्भात ओबीसी बांधवांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलय.
खरं तर सरकार येणं अपेक्षित होतं. शिंदे समिती येणं अपेक्षित नव्हतं. शिंदे समितीला विनाकारण पुढे घालत आहे. आम्ही सांगितलं की सातारा गॅझिटिअरचा सर्व मराठा कुणबी आहे. हैद्राबादच्या गॅझिटेरिअरचा मराठाही कुणबी आहे. त्याची अंमलबजावणी हवी. एक घंटा वेळ देणार नाही. सगे सोयऱ्यांच्याबाबतही तडजोड नाही. मराठा आणि कुणबी एक आहे. ५८ लाख नोंदीचा आधार आहे. जीआर काढा असे मनोज जरांगे म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनाला सामाजिक पार्श्वभूमी आहे. सागर बंगल्यावरून एक द्वेष निर्माण झाला ओबीसी मराठा. या विचाराला तिलांजली दिली पाहिजे सरकारनी राजधर्म पाळावा. माणसाने माणसासारखं वागाव आंदोलन हे आपल्याच राज्यातले आहे असे ते म्हणाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढा मोठा समाज एकत्र जमतो त्याची दखल घेणे आवश्यक आहे. ज्यांची जबाबदारी आहे तो गावोगावी भांडण लावत फिरत आहे. याची गंभीर्यपूर्वक स्वतःहून लक्ष घेण्याची गरज मात्र दुर्दैवाने तसे दिसत नाही ही वस्तुस्थिती. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जावं असे ते म्हणाले.
धुळे शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वीच धुळे येथे आज येलो अलर्ट देण्यात आला होता. दोन दिवस झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे पिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगेंच्या भेटीला उपोषणस्थळी गेले आहेत. जरांगेंच्या भेटीनंतर पुन्हा उपसमितीची बैठक होणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगेंमध्ये चर्चा सुरु आहे. कोकण विभागीय आयुक्तही उपस्थित.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन का केलं? ते का परत आले याचं उत्तर फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.त्यामुळे आता मुंबईकरांना त्रास होतोय हे खरं आहे. पण या मागचा तोडगा काय याबद्दलही शिंदेंच सांगू शकतली.असही ते राज ठाकरे म्हणाले आहेत.
बारामतीत झालेल्या दोन दिवसाच्या पावसा नंतर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये 63% जलसाठा असल्याचं दिसत आहे. जिल्ह्यातील बारामती प्रकल्पांमध्ये 65 टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांमध्ये 55 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्याला भासणारी पाणीटंचाई यामुळे दूर झाली आहे.
जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी टीका केली आहे. हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ते पुढे म्हणाले, “ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत.” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळाला भेट देत गणपती बाप्पाची आरती केली.
राजकारणात जलद गतीने निर्णय होत नसतात, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, यादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरण, आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार
धनंजय देशमुख यांची तपास यंत्रणेवर नाराजी
आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्याही लक्षात राहिला नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप
मी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय – धनंजय देशमुख
परंतु त्याचा कुठेच थांग पत्ता लागत नसल्याचे उत्तर या यंत्रणे कडून येत आहे – धनंजय देशमुख
धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
राज्यातील ओबीसी नेत्यांच्या ऑनलाइन बैठकीत ओबीसी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन करण्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत करतील.
आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याने धनंजय देशमुख यांची तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्याही लक्षात राहिला नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप आहे. मी वेळोवेळी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय. पण त्याचा कुठेच थांग पत्ता लागत नसल्याचे उत्तर या यंत्रणे करून येत आहे, असा आरोप देशमुखांनी केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल. वाल्मीक कराडच्या जामिनाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला.विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची गैरहजेरी होती.विष्णू चाटेंच्या दोष मुक्तीचा निर्णय सुद्धा न्यायालयाने राखून ठेवला. उर्वरित आरोपींचा वकिलामार्फत दोष मुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल झाला.
जरांगे यांच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. शरद पवार हे जरांगे सारखे सूसाईड बॉम्ब तयार करतात आणि त्याचा वापर करतात हे राज्याचं दुर्देवं आहे. त्याचा राज्यावर परिणाम होईल. पवारांची कारकीर्द पाहिली तर ती अशीच राहिलेली आहे. त्यांनी कुणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही. त्यांचा इतिहास तपासून पाहा. महाराष्ट्र अराजकतेकडे नेणे. जाती जातीत भांडणं लावणे हे काम पवारांनी केलं आहे. वसंतदादांपासून ते वसंतराव नाईक यांच्या काळापर्यंत पवारांनी राज्यात दंगली घडवल्या असा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षावर जाऊन बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतले. ते थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
मराठा रिझर्वेशन ते आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे तर ती बरोबर आहे घटनेला धरून आहे फक्त त्याच्यासाठी मराठा मागास आहे मान्य करायला हवे, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले. सामोपचाराने हे 27 टक्के जे आहे ते कसं वाटून घ्यायचं हे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ठरवणं आवश्यक आहे 50 टक्याच्या वर रिझर्वेशन मिळणार नाही ही काळया दगडावरची रेष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व योजनांवर निधी खर्च केला जातो. मात्र शेतकऱ्यांसाठी निधी खर्च केला जात नसल्याचे सांगत जळगावातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी सरकारसह प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा नियोजन समितीचा बैठकीत सुद्धा पालकमंत्र्यांसमोर आमदार किशोर पाटील यांनी या विषयावर प्रश्न मांडत खंत व्यक्त केली आहे.
गोंदिया तालुक्यातील बटाणा येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली. आगीत तिन्ही घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सचिन रहांगडाले, नुतनलाल रहांगडाले, छत्रपाल रहांगडाले अशी पिडीत घरमालकांची नावे आहेत.
मराठा आरक्षण उप समितीच्या बैठकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर एकूण तीन मंत्री दाखल. राधाकृष्ण विखे पाटलांसह चार मंत्री आणि प्रशासनातील काही अधिकारी बंगल्यावर उपस्थित आहेत. इतर मंत्री व्हिसीद्वारे उपस्थित असणार आहेत. मराठा आरक्षण उप समितीचे सचिव देखील उपस्थित आहेत. काही वेळातच बैठक होणार सुरू.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी. वाल्मिक कराडच्या जामिनाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची गैरहजेरी. विष्णू चाटेंच्या दोष मुक्तीचा निर्णय सुद्धा न्यायालयाने राखून ठेवला. उर्वरित आरोपींचा वकिलामार्फत दोष मुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या… कायदा मंजूर करा… संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला सीएम केलंय, केवळ मुंबईने नाही… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलकांची गर्दी झाली आहे. बीएमसी, CSMTचा रस्ता मोकळा करा… जरांगे पाटलांचं सर्व मराठा आंदोलकांना आवाहन
मराठ्यांचा अपमान करू नका… मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका… आम्हाला आरक्षण हवंय, राजकारण करायचं नाही – जरांगे पाटील
आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर मनोज जरांगे यांनी निशाना साधला… त्यांना काहीही माहिती नसतं. फक्त गोंधळ घालण्यासाठी आलेले असतात. मुंबई न बघितलेल्या पक्षांचे चमचे… असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा अमरन उपोषणाचा दुसरा दिवस… महाराष्ट्रभरातून हजारो मराठा समर्थक मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत… मुंबईत येणाऱ्या मुख्य ईस्टर्न फ्री वे महामार्गावर वडाळा–सीएसएमटी दरम्यान मोठ्या प्रमाणात l वाहतूक कोंडी… सकाळपासून वाहने रांगेत, वाहन चालकांना मोठा त्रास… आंदोलनात सहभागी समर्थक राहण्याची व खाण्याची व्यवस्था करत मोठ मोठे ट्रक आणि वाहने मुंबईच्या दिशेने आणत असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी… तर पार्किंग मिळत नसल्याने महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी वाहने पार्क केल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक कोंडी वर परिणाम होत जाम… मुंबईतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस कार्यरत… मात्र पहाटेच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या चाकरमानी आणि वाहन चालकां मध्ये वाहतूक कोंडीमुळे नाराजी… शासनाकडून उपोषणावर तोडगा काढत वाहतूक कोंडी मधून सुटका करण्याची वाहन चालकांची मागणी…
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगाच रागा लागल्या आहेत.
साधू महंतांच्या नाराजी नंतर शासनाकडून आश्वासन. नाशिकमध्ये झालेल्या संत संमेलनात साधू महंतांनी व्यक्त केली होती नाराजी. प्राधिकरण मधे फक्त अधिकारीच असल्याने साधू महंत झाले होते नाराज..
मुंबई महापालिकेच्या परिसरात पिड अॅक्शन फोर्स दाखल झाली आहे. सकाळीपासून मराठा आंदोलक हे मुख्य रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली. मात्र, ते रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते.
शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीला ठाकरे ठाण्यात येणार. खारकर आळी येथील सीकेपी हॉल मध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार. आगामी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र
– मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सोलापूरात घराघरातून पाठींबा देण्यात आला आहे.
सोलापुरातील कलाकार असलेल्या जाधव कुटुंबियांनी घरगुती गणपतीसमोर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ देखावा केला असून यासोबतच इको फ्रेंडली गणपती आणि समाज प्रबोधन करणाऱ्या पुस्तकांचा देखील देखावा केलाय
– मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्यक्षात जाता आलं नाही, त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हा देखावा केला असल्याची प्रतिक्रिया जाधव कुटुंबियांनी दिली.
पिंपरी-चिंचवड: गुंड पवन बनेटीकडून 2 पिस्तुले जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट 4 ने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात 4 पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसं जप्त केली होती. बाबा शेख गॅंगचा सदस्य आणि तडीपार गुंड पवन देवेंद्र बनेटीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 2 पिस्तुले आणि 2 जिवंत काडतुसे गुन्हे शाखा युनिट चारने जप्त केली.
मराठा बांधवांच्या नाश्तापाण्याच्या व्यवस्थेसाठी बांधव सरसावला आहे. सीएसटी परिसरात बीडमधल्या ओबीसी बांधवाकडून मराठा आंदोलनसाठी पोह्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अमोल केंद्रे असे या युवकाचे नाव असून, जात पात बाजूला ठेवून माणुसकीसाठी मी इथे आलोय अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली असून मराठा आंदोलक आणि पोलिस यांच्यात चर्चा सुरू आहे. कालपासून मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू असून सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले आहेत.
आझाद मैदान परिसरात मध्यरात्री पासून पाऊस कोसळतो आहे. यामुळे मैदान परिसरात चिखल झाला आहे. तरी देखील मराठा आंदोलक मैदानात उपस्थित रहाण्यास सुरुवात झाली आहे. जो पर्यंत जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तो पर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखल, घाणीचं साम्राज्य पसरल असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून धुराची फवारणी करण्यात आली आहे.
‘चला मुंबईत परिवर्तन घडवूया!’ – गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याआधी भाजपने जोरदार बॅनरबाजी करत शहा यांच्या स्वागताची भव्य तयारी केली आहे.
’गणपती बाप्पा मोरया’ म्हणत भाजपने गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शहा यांच्या दौऱ्याआधीच्या बॅनरबाजीने मुंबईच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
आझाद मैदान व मैदानाच्या बाहेर असणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांना रात्रभर रेनकोट वाटप करण्यात आलं. काल आझाद मैदानात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांना पावसाचा सामना करावा लागला होता. येते 2 दिवस पावसाचा अंदाज असल्याने आज सर्व आंदोलनकर्त्यांना यांना रेनकोट वाटप करण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण होणार आहे. रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.
वाशीमधील सिडको सेंटरमध्ये मराठा बांधव अजूनही पोहचत आहेत. सिडको सेंटरमध्ये मराठा बांधव हे विश्रांती करण्यासाठी दाखल झाले आहेत. मराठा बांधव मिळेल त्या ठिकाणी आपली वाहन पार्किंग करून विश्रांती घेत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला सत्ताधारी आमदारांनीही पाठींबा दर्शवला आहे. तसेच दिवसभरात अनेक नेत्यांनी जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यानंतर आता परभणीतील पाथरीचे आमदार राजेश विटेकर मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहेत.
नांदेडला पावसाने झोडून काढलं आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच पावसाचं पाणी शेतात गेल्याने पीकाचं नुकसान झालं आहे.
पंढरपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका सत्ताधारी आमदाराने पाठींबा जाहीर केला आहे. भाजप आमदार समाधान आवताडे यांनी पाठींबा जाहीर केला आहे. आमदार आवताडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. आमदार आवताडे यांनी याबाबतचे पत्र विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 26 ऑगस्ट रोजी श्री माता वैष्णोदेवी जी ट्रॅकवर झालेल्या भूस्खलनाच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती घटनेची चौकशी करेल आणि अहवाल सादर करेल.
सीएसएमचटी स्थानकावरच आंदोलकांनी पंगतीत बसून जेवण केलं. राज्यभरातील आंदोलक या ठिकाणी एकत्र आले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणासाठी सरकारकडून आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. क्रेमलिनने याची पुष्टी केली आहे. भारत आणि रशियामधील धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ही भेट एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
भाजपाचा पहिला नेता जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी पोहोचले. सुरेश धस यांनी उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो तोडगा काढू असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं.
मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने आणि परवानगी सरकारने दिली आहे. आमचा प्रयत्न आहे की, आमचं सरकार मराठा समाजाचे सगळे प्रश्न हाताळत आहे. मराठा समाजाला जे काही जास्तीत जास्त देता येईल ते देणार. याआधीच्या काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. आम्ही जे काही द्यायचं ते आम्ही दिलं आहे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणाच्या ताटात जाऊ नये अशी भूमिका आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरु आहे. आता एक दिवसाची मुदतवाद दिली आहे. त्यामुळे उद्याही उपोषण सुरु राहणार आहे. आरक्षण घेत नाही तो पर्यंत काही जात नाही, असा इशाराही जरांग पाटील यांनी दिला आहे.
आझाद मैदान परिसरात आंदोलकांकडून संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरु झाली आहे. सोबत आणलेला शिधा शिजवून जेवणाची तयारी केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत आलेल्या आंदोलकांकडून एक महिन्याचा शिधा आणण्यात आला आहे. मोबाईल टॉर्च लावून स्वयंपाक बनवला जात आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, ‘आंदोलकांना त्रास दिला जात आहे, सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करावं. तुम्ही आम्हाला इथे त्रास दिला तर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हीही त्रास देऊ. मुंबईत गेल्यावर आमचे हाल केले हे आमच्या लक्षात असेल.’
जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका.
मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावे, सरकारला ही संधी आहे, आरक्षण दिल्यास मराठे तुम्हाला विसरणार नाहीत.
उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली होती आणि आरक्षण दिलेलं आहे आणि टिकवलं आहे. मराठा आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊन दाखवलं आहे, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.
माझगाव फ्रीवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनांची लांब रांग आहे. मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या मराठा बांधवांची वाहने दूरवरून दिसतात.
वाहतुकीमुळे लोक त्यांच्या वाहनांमधून उतरून चालत जात आहेत.
पिंपरी चिंचवड : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तरुणाला अटक
-सोशल मीडियावर पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे
-जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीजवळ हा सगळा प्रकार घडला आहे
-ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.
-त्याच्यासह आशिष वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी गुरुवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे अजितदादाचा पोलीस बंदोबस्त वाढवला
पोलिसांनी साखळी करत अजितदादांना दिला बंदोबस्त
मुंबई- गोवा महामार्गांवर भोस्ते घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. घाटामधे अचानक ट्रक बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाली असून भोस्ते घाटात एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.