29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी ठेवू नका, राज्यातील सर्व मराठ्यांनी…,सोलापुरातून जरांगे पाटील कडाडले
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘समज गैरसमज नको,आम्ही इशारा सभा कोठेही लावलेल्या नाहीयेत, सोलापूर जिल्ह्यात लावली असती तर रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते. आम्ही फक्त गावखेड्यातल्या लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय, आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये नुकसान सर्वांचं आहे, यामध्ये फक्त गरीब मराठ्यांचे नुकसान नाहीये, तर यामध्ये भाजप,शिवसेना,काँग्रेसमध्ये असलेल्या मराठा बांधवांचं देखील नुकसान आहे. व्हॅलीडिटी रद्द करण्यात येत आहेत, आणि मी हे समाजाला दाखवून दिलं आहे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी समाजाच्या हित बघितलं, रक्त जाळून जाळून 58 लाख नोंदी दिल्या. यांना माहीत आहे की जरांगे पाटील पक्क आरक्षण देतोय, मात्र त्यांना आरक्षण द्यायचं नाही. सरकारने आता एक कट रचला आणि गैर समज पसरवला आहे. नियोजित कट रचला, 4 प्रमाणपत्र रद्द केले, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी यावेळी मराठा समाजाला आवाहान केलं आहे. मराठ्यांनो घर सोडायला शिका. 29 ऑगस्ट ला घरासमोर एकही गाडी राहू नये, राज्यातील सर्व मराठ्यांनी आंतरवालीत या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये असलेल्या मराठ्यांनी माझी चूक सांगावी, संजय शिरसाठ यांनी फोन करून कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सांगितलं, यात मी चुकीचं काय बोललो? घोडके नावाच्या व्यक्तीची व्हॅलिडीटी झाली आणि बहिणीची रद्द झाली यात मी चुकीचं काय बोललो? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाळींच वाटोळ करायला लागलेत म्हणून मी बोलतोय, मी याबाबतचे पत्र सुद्धा आणले आहे, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.