
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीला राज्यभरातील मराठा बांधव उपस्थित होते. या बैठकीममध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. आता मराठा समजाला कोणीही रोखू शकत नाही, विजय मिळूनच गुलाल फेकायचा, अंतिम लढाई आहे, आरपारची लढाई आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मराठी समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. 27 ऑगस्टला हा मोर्चा अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. त्यानंतर तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान आता या मोर्चाची तयारी सुरू आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे चावडी बैठका घेत आहेत, धाराशिव जिल्ह्यातल्या कार या गावात जरांगे पाटील यांची बैठक पार पडली, या बैठकीत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
आमची कागदपत्रं अडवली तर आम्ही शासकीय कार्यालयाला घेराव घालणार आहोत, मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत, आमच्या लेकरांचं वाटोळ होत असेल तर आम्हालाही कळतं सरकारला कस नीट करायचं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर देखील आरोप केला आहे. कुणबी सर्टिफिकेट देऊ नयेत यासाठी संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
मुंबईचा जाण्याचा मार्ग
आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय
पर्यायी मार्ग
पैठण,गंगापूर,वैजापूर,येवला,नाशिक, मुंबई