
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ओबीसी नेते या निर्णयाला विरोध करत आहेत. मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढाई लढणार असा निर्धार केला आहे. त्यानंतर आता जालन्यात बोलताना मनोज जरांगे पाटलांनी 32 टक्के आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्द करा अशी मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असं विधान केलं होतं. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘अरे त्याच्यावर बोलायचं म्हटलं की माझं डोकं सरकतं, आम्ही एकमेकाचा आदर करतो, तुला अक्कल राहिली नाही. राजकारणी मराठ्यांमध्ये आणि गरीब मराठ्यांमध्ये गैरसमज कसा पसरेल एवढेच काम तू करतो. ते आमच्या दबावामुळे बोलत नाही असा अर्थ नाही, आम्ही एकमेकांचा सन्मान करतो.’
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ‘तुमचा एक शब्द होता अराजकता माजेल, तेव्हापासून मराठे नेते टाइट झालेले आहे. तुझे शब्द आम्ही राखीव ठेवलेले आहे. तू किती शहाणा आहेस हे आम्हाला माहित आहे. पहिल्यांदा जशा दंगली केल्या तुमचे लोक घालून आणि त्या दंगली तुम्हीच केलेले आहेत असा देखील आरोप जरांगे पाटलांनी भुजबळ यांच्यावर केला आहे. अराजकता माजवेल म्हणजे तू काय दंगली घडवून आणतो का? आमचे मराठ्यांचे नेते तुझ्यासारखे नालायक आणि नासके नाहीत, जातीवाद करत नाहीत, तू जातीवाद करतो असा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे.
जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मराठा धरून ओबीसी लोकसंख्या 60% आहे. बत्तीस टक्के आरक्षणात तुम्ही वेगळे प्रवर्ग केले, ते सगळे प्रवर्ग रद्द करायला पाहिजेत. ओबीसींसाठी 32 टक्के खुलं आरक्षण पाहिजे. आमच्यातरी नोंदी आहेत, तुमच्या तर नोंदी नाहीत, काहीही नाहीत’ असा टोलाही जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.