CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजित दादांची ताकद वाढली, असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ajit Pawar NCP : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजित दादांची ताकद वाढली, असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Fadnavis and Ajit Pawar
| Updated on: Dec 11, 2025 | 10:52 PM

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये सुरू आहे. सर्व मंत्री आणि आमदार या विधिमंडळासाठी नागपूरमध्ये आहेत. या अधिवेशनानंतर जिल्हा परिषदा आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अजित पवारांनी दिली माहिती

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर (शहर व ग्रामीण) तर्फे आयोजित भव्य सत्कार सोहळा व पक्षप्रवेश मेळावा आज उत्साहात पार पडला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच महिला भगिनींचा मान-सन्मान जपला आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या प्रगतिशील विचारधारेनंच आपण चालत आलो आहोत आणि त्याच मूल्यांवर पुढे जाणं ही आपली जबाबदारी आहे. सेक्युलर विचारधारा राज्यासाठी किती महत्वाची आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, असं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना सूचित केलं.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण करण्याचा आपल्यासमोर आदर्श ठेवला. देश आणि राज्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं योगदान हे अपूर्व आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं सामाजिक कार्य आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या निधनानं आपण एक थोर समाजभूषण व्यक्तीमत्त्व गमावलं आहे, अशा भावना व्यक्त केल्या.

नागपूर परिसर हा बहुभाषिक, विविध संस्कृती स्वीकारणारा प्रदेश आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जनसेवेखातर सदैव तयार राहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारा माणूस लोक कधीही विसरत नाहीत, असं सूचित केलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांनी आपापल्या कामाचं नियोजन करावं. एकमेकांना समजून घेत समन्वयानं कामं करावीत. जनसंपर्क वाढवा, लोकांच्या कामी या. पक्ष हा सर्वांचा आहे, पक्ष आपला परिवार आहे. लाडकी बहीण, शेतकरी बांधव, तरुण, महिला अशा प्रत्येक समाजघटकांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत. या सर्व योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, अशा सूचना केल्या.

राज्याच्या एकूण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं अतिशय आवश्यक आहे. कोणीही वंचित राहू नये, हीच आपली भूमिका आहे. सर्व समाजघटकाला सोबत घेऊन विकास साधायचा आहे, असं स्पष्ट केलं.