माझा घातपात करणारा कोण? टॉपच्या दोन बड्या नेत्यांनी परळीच्या नेत्याचं नाव प्रकरणातून वगळलं; जरांगेंच्या आरोपाने खळबळ
Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून नुकताच संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केलेल्या व्यक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आहे. उपोषण सुटल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असतानाच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. माझा घातपात करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रकरण आता मी लावून धरणार आहे. माझा घातपात करणारा कोण होता? परळीच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून हे सुरू होतं. त्या नेत्यावर कारवाई व्हायला हवी होती. पण राज्यातील टॉपच्या दोन बड्या नेत्यांनी परळीच्या नेत्याचं नाव या प्रकरणातून वगळलं. आता मी या प्रश्नाला हात घालणार आहे. एसआयटीपासून सीआयडीपर्यंत या प्रकरणाची नव्याने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीच मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण सोडताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर एक विषय मांडला होता. माझ्यासोबत एका नेत्याची नार्को टेस्ट करा. ही मागणी नाही. त्यासाठी आंदोलन करणार नाही. फक्त माझं म्हणणं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं होतं. पण आज पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आता याच प्रकरणावर काम करणार असल्याचं जाहीर करून टाकलं. त्यामुळे परळच्या नेत्याची चांगलीच गोची होणार असल्याचं दिसत आहे. घातपात करणाऱ्याच्या मागे असणारा हा परळीचा नेता कोण? याचं नाव मात्र त्यांनी सांगितलं नाही.
त्याची ब्रेन मॅपिंग करा
तोच परळीचा म्हणाला होता ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा. तो विषय पुन्हा हातात घेतला आहे. त्याने कुणाला माझा घातपात करायला लावला? तो काय माझ्या जेवणात गोळ्या घालणार होता की दगाफटका करणार होता? हे पुन्हा तपासून ते समोर आलं पाहिजे. काय होता विषय? कोण होता? परळीला त्याचा कोण पीए जात होता. त्यात एक नंबरचा आरोपी कोण करायला हवा होता? कोण तिसराच केला. हे सर्व घेणं गरजेचं आहे. आताही त्या आरोपीला कोण साथ देतंय? हा प्रश्न आता मी लावून धरणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
नार्को टेस्ट करा
या प्रकरणाचा सीआयडीपासून एसआयटीपर्यंत परत तपास झाला पाहिजे. त्या आरोपीच्या संपर्कात कोण होतं? कोण प्रत्यक्ष बोलत होतं? कोण समोर जाऊन बोलत होतं? याचा तपास झाला पाहिजे. परळीचा नेता यात कसा नाही? रश्मी शुक्ला या महासंचालक होत्या. तेव्हा रश्मी शुक्ला, अजितदादा आणि फडणवीस हे नागपूरला बसले होते. त्यावेळी त्याचं नाव बाहेर काढलं. मी आता तो विषय लावून धरणार आहे. त्याची आणि माझी आणि त्या तीन आरोपींची नार्को टेस्ट करायला लावणार आहे. माझ्या प्रकरणात तो नेमका काय करणार होता? करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे. तो मागे राहतो आणि घोडे नाचवल्यासारखं नाचवतो, असंही जरांगे यांनी सांगितलं.