Manoj Jarange Patil : शिंदेंना संपवायचं असतं तर ऑडिओ क्लिप समोर आणली असती का? मनोज जरांगेंचं रामदास कदम यांना उत्तर
Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप बाहेर काढल्यापासून महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन खळबळजनक आरोप केला. त्यानंतर सुरु झालेलं राजकारण आता एका वेगळ्या वळणावर गेलं आहे. मनोज जरांगे विरुद्ध रामदास कदम असा सामना सुरु झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावं, अन्यथा मी पुरावे बाहेर काढीन असं जरांगे पाटील बोलले होते. त्यानंतर काल जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप ऐकवली. आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांचे भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबतचे काही फोटो दाखवले. दोघे एकत्र जेवताना त्या फोटोमध्ये दिसतात.
आता मनोज जरांगे पाटील यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे. “शिंदेंना संपवायचं असतं तर ऑडिओ क्लिप समोर आणली असती का? माझे फोटो दाखवता, रामदास कदम तुम्ही फोटोग्राफर होता का? माझ्याविषयी बोलू नका, नाहीतर मी सुरु होईन. हे एकप्रकराच गौडबंगाल आहे. विनाकारण शिंदेंच्या मागे रामदास कदम यांनी साडेसाती लावलीय. माझ्याविषयी बोलू नका. नाहीतर मी ही सुरु होईन” अशा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
शेवटचं सांगतोय यापुढे माझ्याबद्दल काही बोलायचं नाही
“मी क्लिप बाहेर काढल्यामुळे उलट शिंदेसाहेब सावध झाले. उलट ते आता शोधून काढतील हे कोण लोक आहेत, जे माझी आणि माझ्या मुलाची बदनामी करतायत” असं मनोज जरांगे बोलले. “तुम्हाला तारीख कशी समजली ते फडणवीस, शिंदे साहेबांना सांगा. हे एक गौडबंगाल आहे, कोडं आहे. धमक्या द्यायचं काम बंद करा. मी आदर करतो तुमचा. शेवटचं सांगतोय यापुढे माझ्याबद्दल काही बोलायचं नाही. डोक्यात जायचं नाही. ते जेवायला आले ही पोटदुखी आहे का?. उदय सामंत साहेबांशी बोललो की, ते तुमचे मित्र म्हणणार, प्रसाद लाडांशी बोललो की, तुम्ही म्हणणार. नोकर आहे का तुमचा मी. शेवटचे सांगतो, तुम्ही वयाने मोठे आहात. रामदासभाई तुमचा आदर करतो. तुमच्या मुलाने नीट बोलायला पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील बोलले.
