अहिल्यानगरीत मराठा लग्न आचारसंहिता संमेलन – 2025 साजरे, अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी घेतली शपथ

पुण्याच्या मुळशी येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील हुंडाबळींची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर मराठा समाजातील धुरिणींनी पुढाकार घेऊन मराठा समाजासाठी एक आचार संहिता जारी केली होती.

अहिल्यानगरीत मराठा लग्न आचारसंहिता संमेलन - 2025 साजरे, अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी घेतली शपथ
| Updated on: Aug 03, 2025 | 8:19 PM

वाढत्या हुंडाबळी प्रकरणानंतर आणि मुलींवर होत असलेल्या अन्यायानंतर अहिल्यानगर मराठा समाजाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी लग्नासाठीची आचारसंहिता घालून दिली होती. आता मराठा समाजाच्या वतीने आज लग्नाच्या आचारसंहितेचा प्रचार- प्रसार व्हावा आणि ती समाजात रुजवावी यासाठी “मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025” भरवण्यात आले होते. अहिल्यानगर शहरातील कोहिनुर मंगल कार्यालयात येथे हे संमेलन पार पडले.या संमेलनाला हभप भास्करगिरी महाराज, हभप जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्यावतीने आज “मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025” चे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. समाज्यात लग्नानंतर मोठ्या प्रमाणात हुंडाबळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक विवाहित महिला आत्महत्या करीत आहेत. हुंडाबळी ही प्रथा बंद पडावी यासाठी मराठा समाजाच्यावतीने आज मराठा लग्न आचारसंहिता संमेलन घेऊन शपथ देण्यात आली.

अहिल्यानगरच्या मराठा समाजाच्यावतीने दोन महिन्यांपूर्वी लग्नासाठीची लग्न आचारसंहिता घालून दिली होती. लग्न आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आज संमेलन घेण्यात आल होते. समाजात भपकेबाज लग्न करण्यासाठी अनेक जण जमीन विकून आपल्या मुलीचं लग्न करतात आणि नंतर ते आर्थिक अडचणीत सापडतात. त्यामुळे प्रत्येक समाजात अशी संमेलनं झाली पाहिजेत असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे. तसेच लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता दिसत आहे ती देखील बंद झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी केली.

काय झाले ठराव

प्री-वेडिंगवर बंदी, हुंडा देणे -घेणे बंद, डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यांमध्ये लग्न समारंभ करणे, साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करणे, यासह अनेक अटी यावेळी घालण्यात आल्या. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. यावेळी मुलीच्या वडिलांना मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. या खर्चापासून वाचण्यासाठी ही लग्नाच्या आचारसंहिता घालण्यात आली आहे. खरंतर आजच्या लग्न आचारसंहिता संमेलनाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी उपस्थितांना शपथ देखील देण्यात आली.आता या आचारसंहितेचा येत्या काळात बदल दिसून येतो का? हे पण अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

कशी आहे लग्न आचारसंहिता

*लग्न सोहळा तीनशे ते पाचशे लोकात करावा

*साखरपुडा हळद आणि लग्न एकाच दिवशी करावेत

*प्री-वेडिंग प्रकार बंद करावा

*लग्न वेळेवर लावावे वधू-वरांना हार घालताना उचलू घेऊ नये

*लग्नात हुंडा देऊ घेऊ नये

*कर्ज काढून लग्नात खर्च करू नये

*डिजे लावू नये त्याऐवजी पारंपारिक वाद्य आणि लोक कलावंतांना संधी द्यावी

*नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पाय बंद घालावा

*लग्न सोहळ्यात फक्त वधू आणि वर पित्यानेच फेटा बांधावेत

*लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याचे वस्तू आणि गाड्यांचे चाव्या देऊन देखावा करू नये

*रोख स्वरूपात आहेर करावा किंवा पुस्तके द्यावेत भेटवस्तू साड्या देऊ नये

*अन्नाची नासाडी थांबवावी, भोजनात पाच पेक्षा जास्त प्रकार असू नयेत

*भांडी फर्निचर रुखवताऐवजी रोख रकमेची एफडी मुलीचे नावे करावी

*बस्ता आणि मानपान ज्यांचा त्यांनीच करावा

*सामूहिक विवाह ही काळाची गरज समजून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

*लग्नानंतर मुलीच्या संसारात मुलीच्या आईकडून मोबाईलवर होणारा हस्तक्षेप बंद करावा

*सासऱ्याच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये

*नवउद्योजक व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी उद्घाटन कार्यक्रमाला ऐपतीप्रमाणे रोख रकमेची पाकिट द्यावे किंवा त्यांच्याकडचे खरेदी करावी

*लग्न आणि दशक्रिया प्रसंगी आशीर्वाद आणि श्रद्धांजली नको

*उद्योग आणि आर्थिक साक्षरतेवर समाज प्रबोधन करावे