Manoj Janage Patil : मोठी बातमी! उपोषण सुरू होताच सरकारची मोठी अॅक्शन, थेट अधिकारी निलंबित; विखे पाटील यांची जरांगेंसमोरच माहिती
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. कुणबी प्रमाणपत्र वाटपात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या एका अधिकाऱ्याला निलंबित केल्याचे विखे पाटलांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आजपासून उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शेतशिवारात उपोषण सुरू केलं आहे. रणरणत्या उन्हात हे उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवली सराटीत आज परत आले. त्यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी विखे पाटील यांनी त्यांना शासनाचा ड्राफ्टही दिला. कुणबी प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ करणाऱ्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्याचं विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या शेजारी बसूनच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी पातळीवर काय काय तयारी केली याची माहिती दिली.
आतापर्यंत 3 लाख प्रमाणपत्र दिले आहे. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे नवीन प्रमाणपत्र देणार आहे. त्यासाठी वंशावळी निश्चित केली जात आहे. काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात निष्काळजीपणा होता, अधिकारी फाईल थांबवून ठेवायचे. काल कन्नडच्या (छत्रपती संभाजी नगरमधील) उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वंशावळी असतानाही, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश असतानाही या अधिकाऱ्याने दाखले दिले नाहीत. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. अशा प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करत आहोत, असं सांगतानाच हैद्राबाद गॅझेटनुसार साधारण दोन हजार सर्टिफिकेट दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
आश्वासन नाही, 100 टक्के कार्यवाही
सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे यांनी वेळ दिला पाहिजे. एकूण 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या राज्यातीलच आहे. आम्ही सर्व प्रश्न मार्गी लावणार आहोत. हे केवळ आश्वास नाही. 100 टक्के कार्यवाही करणार आहोत, असं सांगतानाच अभ्यासक येईपर्यंत जरांगेंनी सावलीत बसावं. तुम्ही चर्चा करा. गरज पडली तर मला बोलवा. मी उपलब्ध आहे, असं आवाहन विखे पाटलांनी केलं.
सुखाने खाऊ देत नाही
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीही भूमिका मांडली. तुम्ही कितीही चांगलं दिलं तरी गायकवाड आयोगाने12-13 टक्क्याने आरक्षण दिलं होतं, त्यालाही चॅलेंज केलं गेलं. आता एसीबीसीचं 10 टक्के आरक्षण सरकारने दिलं. मागास सिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैद्राबादचा जीआर दिला तरी चॅलेंज झाला. उद्या सातारचा दिला तरी चॅलेंज होईल. कारण मराठ्यांना सुखाने खाऊ देत नाहीत. कितीही चांगलं दिलं तरी सुखाने खाऊ देत नाहीत. त्यामुळे तुम्ही जीआर काढा, असं जरांगे म्हणाले.
तर सरकारला चटके लागतील
मी उपोषण सोडणार नाही. मी उन्हातच बसेन. मी बसलो तर सरकारला चटके लागतील. त्यामुळे मला बसावं लागेल. संध्याकाळी महाराष्ट्रातून अभ्यासक येतील. ते आल्यावर आम्ही पुढची भूमिका घेऊ. चर्चेनंतरच बोलू, असंही जरांगे म्हणाले.