मोठी बातमी! सरकारचा मसुदा तयार, खुद्द विखे पाटील घेणार जरांगेंची भेट; मराठा आरक्षणावर अखेर तोडगा?

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सरकारचा मसुदा तयार आहे, मी आणि उपसमितीतील सदस्य आता जरांगे पाटलांची भेट घेणार आहोत असं विखे पाटलांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी! सरकारचा मसुदा तयार, खुद्द विखे पाटील घेणार जरांगेंची भेट;  मराठा आरक्षणावर अखेर तोडगा?
Vikhe and Jarange
| Updated on: Sep 02, 2025 | 3:25 PM

मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण राज्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. अशातच आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सरकारचा मसुदा तयार आहे, मी आणि उपसमितीतील सदस्य आता जरांगे पाटलांची भेट घेणार आहोत असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारचा मसुदा तयार, आम्ही जरांगे पाटलांची भेट घेणार – विखे पाटील

माध्यमांसोबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे. त्याला समितीची मान्यता मिळाली आहे. आता आम्ही जरांगे पाटलांना भेटणार आहोत. त्यांच्यासोबत याबाबत चर्चा करणार आहोत. जरांगे पाटलांनी शिंदे समितीसमोर जे मुद्दे उपस्थित झाले होते त्यावर चर्चा केली आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा प्रस्ताव तयार केला आहे, तो आता आम्ही जरांगे पाटलांसमोर मांडणार आहोत.

आमच्या भूमिकेवर जरांगे पाटील सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा – विखे पाटील

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे. समितीचे सर्व सदस्य जरांगे पाटलांची भेट घेणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की आमच्या भूमिकेवर जरांगे पाटील सकारात्मक निर्णय घेतील. त्यांच्याशी आमची चर्चा झालेली नाही, त्यांच्या मागण्या आल्या होत्या, त्यांनी शिंदे समितीकडे केलेल्या सूचनांचा विचार झाला. त्यांच्या सर्व मागण्यांचा आदर केलेला आहे.

मुंबईतील रस्ते खाली करण्याचे न्यायालयाचा आदेश

न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईचे रस्ते खाली खरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस मराठा आंदोलकांना आवाहन करत आहेत. आम्ही तुम्हाला आंदोलनासाठी सहकार्य करत आहोत, तुम्हीही आम्हाला सहकार्य करा असे मुंबई पोलीस सांगत आहेत. मुंबईच्या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या गाड्या काढा, रस्ते मोकळे करा असा असे पोलीस सांगत आहेत. तर ज्या गाड्यांत जेवण आहे त्या इथेच ठेवू द्याव्यात अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे.