तर मराठा समाजाचा उद्रेक होईल… छत्रपती शाहू महाराज यांचं महत्त्वाचं विधान

खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकार मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत राहिल्यास 'उद्रेक' अटळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जरांगेंच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन करत, मराठा आणि कुणबी एकच असल्याचे शाहू महाराजांनी स्पष्ट केले.

तर मराठा समाजाचा उद्रेक होईल... छत्रपती शाहू महाराज यांचं महत्त्वाचं विधान
छत्रपती शाहू महाराज यांचं महत्त्वाचं विधान
| Updated on: May 30, 2026 | 11:20 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. रणरणत्या उन्हात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी आर या पारची लढाई सुरू केल्याने सरकारचं टेन्शन वाढलं आहे. मनोज जरांगे यांची सरकारने मनधरणी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी जालन्यात समृद्धी महामार्ग रोखला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे. सरकारने प्रकरण गंभीरपणे नाही घेतलं तर मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशाराच छत्रपती शाहू महाराज यांनी दिला आहे.

खासदार छत्रपती शाहू महाराज यांनीही कोल्हापुरात रणरणत्या उन्हात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे गंभीरपणा नाही दाखवला तर मराठ्यांचा उद्रेक होईल का? असा सवाल पत्रकारांनी शाहू महाराज यांना केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचा उद्रेक होऊ शकतो, असं शाहू महाराज म्हणाले.

जरांगेंनी आक्रमक असलंच पाहिजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंची भूमिका आक्रमकच असली पाहिजे. ते उन्हात बसले. आम्हीही उन्हात बसलो. शेतकरी म्हटल्यावर त्याला ऊन पाण्याचा काही फरक पडत नाही, असं सांगतानाच वाटाघाटीत काय निघतंय ते पाहू. त्यातून कळेल ते सीरियस आहे की नाही, असं त्यांनी सांगितलं. आठ वर्षापासून आंदोलन सुरू आहे. वाटाघाटी होत आहे. काही तरी ठरत आहे. पण अंमलात येत नाही. किंवा येतच नाही. अशी परिस्थिती आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

काय घडतंय, काय ठरतंय?

जरांगे पाटील आणि शासनात काय ठरतंय आणि घडतंय ते आम्हाला माहीत नाही. वर्तमानपत्रात जे छापून येतं त्यातूनच माहिती मिळते. पण प्रत्यक्षात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही हे आम्हाला कोल्हापुरात कळत नाही. पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे. नेहमी मराठा एकसंघ राहतीलच, असं छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूर गॅझेटचा विचार करा

जिल्ह्यांचं गॅझेट पाहायला कोणी तयार नाही. शासनाने कोल्हापूर गॅझेटचा विचार केला पाहिजे. त्या आधारे निर्णय घेतला पाहिजे. मनोज जरांगे जिथे राहतात. तो भाग हैद्राबाद संस्थानात होता. ते निजामाचं स्थान आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या जरांगेंना तिथली आठवण येते. इथली येत नाही. कोल्हापूर गॅझेट त्यांना लांबचं वाटतं. हैद्राबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतं, असं शाहू महाराज म्हणाले.

मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे. पूर्वीच्या काळात लढाईच्या काळात लढाईला जाणाऱ्यांना मराठे म्हटलं जायचं. परत आल्यावर शेती करायचे म्हणून त्यांना कुणबी म्हटलं जायचं. सर्व मराठे हे कुणबी आहेत. आणि सर्व कुणबी मराठे आहेत.

 

Follow Us