मतांच्या भिकेसाठी अजून काय करणार? रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणे वाजवण्यावरून भडका, थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंंबईतील रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणे वाजवण्यावरून एकच भडका उडाला आहे. या वरून गोवर्धन देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

मुंबईतील विविध रेल्वे स्टेशनवर छट पूजेची गाणी वाजवण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या आदेशाने मराठी प्रवाशांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे. मराठी सणाऐवजी छटपूजेसाठी भोजपुरी गाणे वाजवल्याने मनसेसहित इतर राजकीय पक्षांनी एकच संताप व्यक्त केला आहे. मनसेनंतर आता मराठी एकीकरण समितिचे गोवर्धन देशमुख यांनी रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरून राज्य सरकाला सवाल केले आहेत.. मतांच्या भिकेसाठी अजून काय करणार, असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्राचे बिहार करू नका. रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणे वाजवून मराठी माणासाचा संयम पाहू नका. शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानगी नको. सार्वजनिक पर्यटन ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा. बिहारचा हा उत्सव खासगी ठिकाणी साजरा करावा. यात पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे.
मुंबई रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात भानावर या, अशा शब्दात गोवर्धन देशमुख यांनी टीका केली. ‘मुख्यमंत्री महोदय कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार? मुंबई महाराष्ट्र विकायला काढला आहे का? राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे. आता आम्हाला चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे. महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका. रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा गोवर्धन देशमुख यांनी दिला.
राजू पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘आज महाराष्ट्रात दिवाळीतील भाऊ-बहीण या पवित्र नात्याचा सन्मान करणारा भाऊबीजेचा सण. मग महाराष्ट्रातील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आज भाऊबीजेच्या सणाची मराठी गाणी का ऐकू येऊ नयेत ?महाराष्ट्राच्या सण-उत्सवांना आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी छटपूजेची गाणी लावून परप्रांतीय सणांचा उत्सव साजरा करण्याची गरज काय? प्रश्न छटपूजेचा किंवा कोणत्याही समाजाच्या सणाचा विरोध करण्याचा नाही. पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सणांना आणि मराठी संस्कृतीला योग्य तो सन्मान मिळणार की नाही? 12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारला प्रश्न विचारला जात होता ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? आज हाच प्रश्न भाजपाला विचारण्याची वेळ आली आहे’.
