
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, भाजपच्या दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं बैठक पार पडली. राज्यात सध्या काही मंत्र्यांची प्रकरणं गाजत आहेत, व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर किती मंत्र्यांच्या विकेट जाणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची शक्यता, या भेटीनंतर वर्तवण्यात येत आहे.
फडणवीसांचा दिल्ली दौरा वादग्रस्त मंत्र्यांसाठी संक्रात ठरण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी आज अमित शाह यांची भेट घेतली या भेटीदरम्यान वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट याचा एक बँगेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्या बँगेत पैसे असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता, हे प्रकरण ताजं असतानाच त्यानंतर विधानभवनाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ समोर आला, या व्हिडीओमुळे सरकारच्या अडचणी वाढल्याच्या पाहायला मिळालं, या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.