मोठी बातमी! सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वाची बैठक, पार्थ पवारही हजर, नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित होते, तसेच युगेंद्र पवार हे देखील या बैठकीला हजर होते. सोमेश्वर साखर कारखाण्याची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी शरद पवार यांची भूमिक आहे. त्यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरोधात -पवार असा असा सामना दिसून येत आहे. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पॅनल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल आमने-सामने आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका शरद पवार यांची आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते.
दरम्यान दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. शरद पवार हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच उद्या शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पंढरपूरमध्ये मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळू दे असं साकडं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विठ्ठलाला यावेळी घालण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. गुरुवारी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडली होती.
