राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज आणि उद्या अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

Rain Update: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आषाढी एकादशीलाही राज्यात आषाढधारा कोसळणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आणि उत्तर कोकणातील तुरळक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. काही जिल्ह्यामध्ये सोसाट्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज आणि उद्या अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. यामुळे घाट परिसराला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.
मुंबईत पावसाचा जोर कायम
रविवारी मुंबईत सकाळपासून पाऊस सुरु आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे नालासोपारा पूर्व आचोळा रोड, नागीनदास पाडा, आचोळा पोलीस स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावरील सखल भागात पाणी साचले होते.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/kIvRBpyCXY
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 5, 2025
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवस या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी रात्री विदर्भातील चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात विदर्भात सरासरी पेक्षा कमी झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर पकडला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीत पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणांसह नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट एक इंचांवर आहे. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली आहेत.
पुढील चार दिवस कुठे हाय अलर्ट ?
पुढील चार दिवस कुठे हाय अलर्ट ?
5 जुलै : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच नाशिक ,पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .
मुंबई,नंदुरबार, धुळे ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
6 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट , कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट
बीड ,नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली : यलो अलर्ट
7 जुलै : पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
ऑरेंज अलर्ट :रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
8 जुलै: रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट
9जुलै : तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट,नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश