MHADA ची घरे आता श्रीमंतांनाच परवडणारी ! म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर का गेली ?
मुंबईत घर घेणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. मुंबई आणि उपनगरात घरे मिळण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. परंतू अलिकडे म्हाडाची घरे देखील महाग होत असल्याने या घरांची मागणी कमी होत चालली आहे. संपूर्ण राज्यात म्हाडाची 12 हजार घरे विक्रीच्या अभावी पडून आहेत. म्हाडा ही खरेतर सरकारी यंत्रणा आहे, तिने जर फायदा कमाविण्यासाठी घरे महाग केली तर सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न कसे पूर्ण होणार ? या विषयाचा घेतलेला धांडोळा...

मुंबईतील जमिनीचे गगनाला भिडलेले भाव पाहता मुंबईत घर घेणे हे अशक्य कोटीतील गोष्ट झाली आहे. परंतू म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी असल्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होत होते. परंतू गेल्या काहीवर्षांत म्हाडाच्या घरांच्या किंमतीही अवाच्या सवा वाढत चालल्या आहेत. त्यामुळे म्हाडाच्या कोकण मंडळासह इतर मंडळातील म्हाडाची घरे देखील विक्री अभावी पडून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. म्हाडाची घरे का महाग होत आहेत ? सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करुन देण्याच्या म्हाडाच्या हेतूलाच त्यामुळे बाधा बसत आहे. म्हाडाने घरांच्या किंमती वाजवी ठेवाव्यात त्यात जादा वाढ करु नये अशी मागणी समाजातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याविषयाचा घेतलेला आढावा ...
