
Meera Bhaindar MNS Viral Video : मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मीरा भाईंदरमधील व्यापरी तसेच व्यापारी संघटनांनी मनसेविरोधात मोर्चा काढला आहे. तसेच मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली होती, त्यानेच त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे. मनसेचे कार्यकर्ते आले. त्यांनी येऊन मराठी बोलली पाहिजे असे सांगत मला मारहाण केली तसेच शिवीगाळ केली, असा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे.
त्या रात्री साधारण साडे दहा वाजता मनसे पक्षाचे सहा ते सात जण दुकानात आले. कॅश काऊंटरजवळ येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागितली. पाण्याची बॉटल दहा रुपयांची हवी आहे की 20 रुपयांची हवी आहे, असं कॅश काऊंटरजवळच्या कर्मचाऱ्याने विचारलं. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते म्हणाले की हिंदी नव्हे तर मराठीत बोल. महाराष्ट्रात व्यवसाय करायाचा असेल तर मराठी बोलावं लागेल,असं हे कार्यकर्ते म्हणाले. तसेच त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. दुकान फोडून टाकण्याचीही त्यांनी धमकी दिली, अशी माहिती त्या व्यापार्याने दिली.
मी त्यावेळी तिथेच उभा होतो. मी म्हणालो की काऊंटरवरच्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून येऊन सात ते आठ महिनेच झाले आहेत. त्याला मराठी येत नाही. मी या दुकनाचा मालक आहे, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर आता नुकतेच विधेयक मंजूर झाले आहे. मराठी बोललं पाहिजे. हिंदी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला कामावर का ठेवलं, असा जाब त्यांनी मला विचारला. माझे दुकान महाराष्ट्रात आहे, असे मी त्यांना म्हणालो. त्यानंतर महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? असा प्रश्न त्यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर देताना महाराष्ट्रात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, असं मी त्यांना बोललो, अशी माहिती त्या व्यापार्याने दिली. तसेच हे सर्व घडल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते माझ्यावर तुटून पडले. तीन ते चार जणांनी मला मारलं. इतर तिघांनी मला शिव्या दिल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मारहाणीनंतर मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढला आहे. व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर हा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे, असा दावा मनसेने केला आहे.