VIDEO: रुग्णांचं निकृष्ट जेवण पाहून बच्चू कडूंचं रौद्ररुप, सर्वांसमोर आचाऱ्याच्या कानशिलात लगावली

राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार, महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा रौद्ररुप पाहायला मिळालंय.

  • गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला
  • Published On - 20:02 PM, 6 Apr 2021
VIDEO: रुग्णांचं निकृष्ट जेवण पाहून बच्चू कडूंचं रौद्ररुप, सर्वांसमोर आचाऱ्याच्या कानशिलात लगावली

अकोला : राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार, महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा रौद्ररुप पाहायला मिळालंय. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असणाऱ्या बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील जेवणाची व्यवस्थाही पाहिली. मात्र, सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी सर्वांसमोर तेथे उपस्थित आचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे (MLA Bachchu Kadu slapped Chef of government hospital in Akola).

अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. तसेच रुग्णालयाकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेत तपासणी केली. यावेळी रुग्णालयात रुग्णांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचं त्यांच्या पाहणीत समोर आलं. यावर संतापलेल्या बच्चू कडू यांनी रुग्णालयाच्या आचाऱ्याला (स्वयंपाकी) बोलावून चौकशी केली. मात्र, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरं आल्याने बच्चू कडू यांनी सर्वांसमक्ष त्याच्या कानशिलात लगावली.

पाहा नेमकं काय घडलं

बच्चू कडू यांनी यावेळी जेवणाची व्यवस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षीच्या जेवणाच्या खर्चाचा हिशेबही मागितला. मात्र, त्याचा कोणताही हिशोब तेथे नव्हता.

आईची शप्पथ घेऊनही स्वयंपाकी खोटं बोलला आणि बच्चू कडू संतापले

बच्चू कडू यांनी संबंधित आचाऱ्याला विचारलं की जेवणात किती मूग दाळ वापरतो. तर त्याने 10 किलो वापरतो असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे याआधी रुग्णालयात बोलताना त्याने 3-3 किलो वापरत असल्याचं उत्तर दिलं होतं. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी त्याला आईची शप्पथ घेऊन खरं सांग असं सांगितलं. आईची शप्पथ घेऊनही स्वयंपाकीने खोटंच सांगितल्यानं बच्चू कडू यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. यावर आचाऱ्याने आपण घाबरल्याने असं वेगळं उत्तर दिल्याची सारवासारव केली. यावेळी बच्चू कडू यांनी यानंतर स्वयंपाकीच्या समोर सरकारी रेकॉर्डला किती दाळ आहे आणि किती वापरली जाते यावर माहितीही दाखवली.

हेही वाचा :

लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?

बच्चू कडू विरुद्ध अधिकारी वाद उफाळला, निलंबन कारवाईविरोधात कामबंद आंदोलन

अधिकाऱ्यांनी फाईली दाबल्या तर कायदा मोडून तुरुंगातही जाईन, रक्तदान करुन बच्चू कडूंनी पदभार स्वीकारला

व्हिडीओ पाहा :

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.