Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंच दाखल्यांसह एकदम कडक उत्तर
Raj Thackeray : "आपल्या सैन्यात मराठा, शीख, जाट, पंजाब, पॅराशूट, गडवाल रायफल, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू काश्मीर, गोरखा रायफल आहे. लडाख स्काऊट, सिक्कीम स्काऊ आहे. इथल्या राज्याच्या रेजिमेंट आहे. शत्रू दिसल्यावर तूटून पडतात ना. मग भाषेचा प्रश्न येतो कूठे" असा सवाल राज ठाकरेंनी केला.

हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकली हा मुद्दा उपस्थित केला. अनेकदा ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात हा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यावर आज राज ठाकरेंनी दाखल्यांसह सडतोड उत्तर दिलं. “ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. मग पुढे, दादा भुसे मराठीत शिकले मंत्री झाले. फडणवीस मराठीत शिकले मंत्री झाले. याचा काय संबंध,. कुणाची मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल. असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात” असं राज ठाकरे म्हणाले.
“आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्यावर. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
एआर रहमान यांचं काय उदहारण दिलं?
“दाक्षिणात्य कलाकार इंग्रजी माध्यमात शिकले. एआर रहमान परवा व्यासपीठावर उभे होते. बाई तामिळ बोलत होती. अचानक हिंदी बोलायला लागली. एआर रहमानने बघितलं हिंदी? आणि ते खाली उतरले. बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले. इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढलं. त्यांनी भाषेशी तडजोड केली नाही” असं राज ठाकरे म्हणाले.
मग भाषेचा प्रश्न येतो कुठे?
“म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. कोणती भाषा. काय वाकडं झालं. आपल्या सैन्यात मराठा, शीख, जाट, पंजाब, पॅराशूट, गडवाल रायफल, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू काश्मीर, गोरखा रायफल आहे. लडाख स्काऊट, सिक्कीम स्काऊ आहे. इथल्या राज्याच्या रेजिमेंट आहे. शत्रू दिसल्यावर तूटून पडतात ना. मग भाषेचा प्रश्न येतो कूठे”
तुम्हाला जातीत विभागतील
“भाषावार प्रांत रचना त्याच कारणासाठी होती ना. या गोष्टी का सुरू केल्या. आता सांगून ठेवतो. आज मराठी म्हणून एकत्र आला. महाराष्ट्रातील तमाम मराठी एकत्र आला आहे. याचं पुन्हा राजकारण तुम्हाला जातीत विभागतील. जातीचं कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीत विभागायला सुरू करतील” असं राज ठाकरे म्हणाले.