Raj Thackrey : वर्षभरात काहीही होऊ शकतं, आताची फोडाफोडीची तयारी ही 2029 साठी- राज ठाकरेंचं सूचक विधान
राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनेक महत्त्वपूर्ण राजकीय भाष्य केले. ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर बोलताना त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवले आणि २०२९ च्या तयारीचा उल्लेख केला. येत्या वर्षभरात देशात मोठे राजकीय बदल होऊ शकतात, असा सूचक इशारा देत, कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईत पार पडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपस्थित कार्यकारी,पदाधिकारी यांना संबोधित केलं. एसआयआरकडे दुर्लक्ष करू नका, वेगवेगळ्या मुद्यांत लोकांना गुंतवून राजकारणी, सत्ताधारी दुसरीकडे त्यांचं कामसाधून घेत आहेत असा आरोप त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीवरही राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले. आणि याचवेळी बोलता बोलता त्यांनी सूचक भाष्यही केलं. या वर्षभरात काहीही होऊ शकतं, 2029 साठीच्या निवडणुकीसाठी आत्तापासून अमित शहांची तयारी सुरू असल्याचं राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान नमूद केलं.
काय म्हणाले राज ठाकरे ?
ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवरून बोलताना राज ठाकरे यांनी किस्सा सांगितला. ते म्हणाले, परवा काही पत्रकार माझ्याकडे आले तेव्हा त्यांना मी एक प्रश्न विचारला, केंद्रात , राज्यात सत्ता कोणाची ? भाजपची ना… मग मी विचारलं की, शिवसेनेचे हे सहा खासदार भाजपमध्ये न जाता, शिंदेंकडे का गेले ? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे, आणि 2029 ची ही अमित शहा स्वत:ची तयारी करत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
वर्षभरात काहीही होऊ शकतं
त्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जे विरोध करणारे बाकीचे जे गट आहेत, ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीही तयारी. नाहीतर सहा हे भाजपमध्ये जाऊ शकले असते. हे नेमकं काय घडतंय ? मी तुम्हाला सांगतो, ज्याला आपण अंतर्गत वाद म्हणतो ना, ज्वालामुखी, त्रास असा जो गोंधळ आहे ना सगळा, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्त आहे. इतकं आतून त्यांच्याकडे पण सगळं पेटलेलं आहे, की आत्ता फक्त नरेंद्र मोदी आहेत,एक तिकडे मॅग्नेट आहे, त्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतायत, वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वेळ येईल, त्यावेळेस तुम्ही जमिनीत घट्टपणे पाय रोवून उभे राहा, असा कानमंत्र राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला.