
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला आहे. हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको, असा मनसेचा आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा निघावा, अशी मनसेची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपआपल्या आंदोलनाची पत्रकार परिषदेमधून घोषणा केली आहे. ज्यामध्ये मनसेकडून पाच जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे, तर 29 जून आणि सात जुलैला उद्धव ठाकरे हे दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. पण आता खात्रीलायक सुत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आला आहे की, हिदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी, याकरता दोन आंदोलनं नको तर एकच मोर्चा निघालाय हवा, त्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं मनसेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं.
यामध्ये राजकीय श्रेयाचा मुद्दाही निघू शकतो, त्यामुळे कोणत्याही झेंड्याशिवाय हा मोर्चा निघावा असं मनसेचं म्हणण आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं या मोर्चात सहभागी व्हावं आणि हिंदी भाषेच्या सक्तीला आणि सरकारच्या धोरणाला विरोध करावा, अशी भूमिका तसा प्रस्तावर शिवसेना ठाकरे गटाकडे मनसेच्या वतीनं देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षातील नेत्यांचं आज दिवसभरात या संदर्भात एकमेकांशी बोलणं झालं आहे, मात्र अंतिम निर्णय यावर अजून आलेला नाहीये. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे, या पार्श्वभूमीवर देखील मनसेकडून देण्यात आलेल्या या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान दुसरीकडे मनसेनं आपल्या मोर्चाची तारीख देखील बदलली आहे. हा मोर्चा सहा तारखेला होणार होता, मात्र त्याऐवजी तो आता पाच तारखेला होणार आहे.