“राज ठाकरे अमित ठाकरेंची उमेदवारी मागे घेतील, पण माझी उमेदवारी मागे घेणार नाही”, मनसेच्या नेत्याचे मोठे विधान
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरेंनी मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.

Sandeep Deshpande On Aaditya Thackeray : वरळी विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 साली याच मतदारसंघातून ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. तर राज ठाकरेंनी मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. संदीप देशपांडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
संदीप देशपांडे यांनी आज वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संदीप देशपांडेंकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यापूर्वी संदीप देशपांडेंनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा उठवल्या गेल्या होत्या की मनसे वरळीतून उमेदवारी अर्ज मागे घेईल. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. राज ठाकरे कोणताही दुसरा निर्णय घेणार नाही. 2019 ला आपल्या एका कार्यकर्त्याचे तिकीट कापून आदित्य ठाकरेंना तिकीट देण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या बदल्यात त्याला काही देण्यातही आलं नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले.
“उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याचा बळी घेऊन स्वत:च्या मुलाला आमदार केलं”
“आताही अफवा सुरु होत्या की संदीप देशपांडेंना माघार घ्यावी लागणार आहे. अमित ठाकरेंना सपोर्ट करायचा आहे, अशी चर्चा सुरु होती. पण मी ठामपणे सांगितलं की राज ठाकरे एक वेळ अमित ठाकरेंची उमेदवारी मागे घेतील, मात्र संदिप देशपांडेंची घेणार नाहीत. माझे साहेब राज ठाकरे उद्धव ठाकरे नाहीत की दुसऱ्याचा बळी घेऊन स्वत:च्या मुलाला आमदार करतील”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
“…तर राज साहेबांचा सैनिक म्हणून नाव लावणार नाही”
“आपल्या पोरांचं आपल्या कुटुंबाचं मी आणि माझं कुटुंब असं म्हणणारे नेते भरपूर दिसले. पण माझे साहेब वेगळे आहेत. मी साहेबांना विनंती केली होती की जर सर्वांना मान्य असेल तर वरळीतून मी इच्छुक आहे. कारण त्यांना माहित होतं मला वरळीतून का लढायचं आहे? कारण मला आदित्य ठाकरेंना धडा शिकवायचा आहे. जर तुम्हाला धडा शिकवला नाही, तर राज साहेबांचा सैनिक म्हणून नाव लावणार नाही”, असेही संदीप देशपांडे म्हणाले
“या माणसाला लोक कंटाळले आहेत. हा वरळीचा आमदार की धारावीचा आमदार हेच कळत नाही. पण त्या धारावीबद्दल बोलण्याचं एक कारण आहे, कारण तिथे अदानी आहे. आम्ही अंबानीचे आहोत”, असेही संदीप देशपांडेंनी म्हटले.
