Raj Thackeray : मतांची होते चोरी, मनसेने थेट प्रात्यक्षिक करून दाखवले, राज ठाकरेंनी केला गंभीर आरोप!

राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन आणि मतदार याद्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाआधी मतांची चोरी कशी होते, याचे थेट प्रात्यक्षिकच दाखवण्यात आले आहे. मतांची चोरी होत असेल तर निवडणुकीचा उपयोग काय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

Raj Thackeray : मतांची होते चोरी, मनसेने थेट प्रात्यक्षिक करून दाखवले, राज ठाकरेंनी केला गंभीर आरोप!
raj thackeray
| Updated on: Oct 30, 2025 | 8:29 PM

Raj Thackeray Speech : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांशी मुंबईत संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. विशेष म्हणजे या मोर्चात सहभागी होण्यासाठी मी ट्रेनने प्रवास करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यासह त्यांनी निवडणुकीत मतदानाची चोरी होत आहे. आपण दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. भाषणाआधी मनसेच्या मंचावर मतचोरीचे एक प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले असून याच प्रात्यक्षिकाचा आधार घेत राज ठाकरे यांनी राज्यात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी केली.

ईव्हीएम मशीनमधून मतांची चोरी केली जाते

राज ठाकरे यांच्या भाषणाआधी मनसेच्या मंचावर एक मतचोरी कशी केली जाते, याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकात मतांची चोरी कशी केली जाते? हे दाखवण्यात आले. हे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर राज ठाकरे यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी मनसेची मतं चोरली जात आहेत. ईव्हीएम मशीनमधून मतांची चोरी केली जाते, असा आरोप केला. तसेच जगात कुठेही ईव्हीएमवर मतदान होत नाही, सगळीकडे बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया पार पडते, असे म्हणत ईव्हीएम मशीनला विरोध केला.

आयुक्तांच्या बंगल्यावर 550 मतदारांची नोंदणी

मतचोरीची बाब सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे मतदारांच्या याद्या घ्या. घराघरात जा. तुम्हाला मतदारांचे चेहरे समजले पाहिजेत, असे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. तसेच मतदारयाद्या समजून घ्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यावर 550 मतदारांची नोंदणी आहे. एका मतदाराचा पत्ता हा सुलभ सौचालयाचा आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

….तर निवडणुकीचा काय उपयोग?

राज्यात काहीही सुरू आहे. मतदान हा पोरखेळ नाहीये. तुमच्या-आमच्या आयुष्यातील पाच-पाच वर्षे जात आहेत. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. याच जन्मात महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, असे स्वप्न मी पाहात आहे. या स्वप्नांची ईव्हीएम मशीन राखरांगोळी करत असेल तर निवडणुकीचा काय उपयोग? असा रोखठोक सवालही राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी मतचोरी आणि ईव्हीएम मशीनवर घेतलेल्या आक्षेपानंतर सत्ताधारी नेमके काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.