Raj Thackeray : कार नव्हे तर लोकल! मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरेंनी थेट सांगूनच टाकलं; आता थेट…
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी मी स्वत: लोकलने येईल, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Speech : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समोर आज (30 ऑक्टोबर) मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणाआधी राज ठाकरे यांच्या आदेशाने मंचावर ईव्हीएमच्या मदतीने मतांची कशी लूट होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यांनी राज्यात, देशात प्रामाणिक मतदारांचा अपमान होत आहे. जगभरात ईव्हीएम कुठेच होत नाही. असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली. यासह येत्या 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करत मी या मोर्चात सहभागी होण्यासाठी लोकलनेच येणार आहे, असे जाहीर केले.
बॉस सुट्टी देत नसेल तर…
राज ठाकरे येत्या 1 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत. मतचोरीच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करताना बॉस सुट्टी देत नसेल तर त्याला मारा आणि या. तोही मतदार असेल. त्यालाही घेऊन या, असे मिश्किल भाष्यही यावेळी केले. ही मोठी लढाई आहे. आपल्याला लढावी लागेल. महाराष्ट्राला लढावं लागेल. प्रत्येकवेळी महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलं आहे. आताही टाकायचं आहे, असेही पुढे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी सांगितला खास किस्सा
एक नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाला मी स्वत: लोकलने येणार आहे. मी एकदा डोंबिवलीवरून आलो होतो. बरीच वर्ष झाली त्याला. मला डोंबिवलीला जायला तीन साडे-तीन तास लागले होते. डोंबिवलीत शिळ फाट्यावर पोहोचल्यावर तो फाट्यावरच मारतो. रस्ता खराब असल्यामुले मी परत येताना ट्रेननेच जाऊ असा विचार केला. त्यावेळी आमचे सर्व पत्रकार बांधव तिथे आले होते. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. मी रेल्वेने प्रवास केलेला आहे हे त्यांना माहीत नव्हतं. जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला जाताना मी दोन वर्ष हार्बर लोकलने प्रवास केलेला आहे. मला सर्व डबे माहीत होते. मी स्टेशनवर गेल्यावर पत्रकार तिथे तयारच होते. महिलांचा डबा आला. मी फक्त हुल दिली. सर्व महिलांच्या डब्यात घुसले. मी दुसऱ्या डब्यात शिरलो. पण ते जाळीतून शुटिंग करत होते, असा किस्साही यावेळी राज ठाकरेंनी सांगितले.
हजारो लोक मोर्चात सहभागी होण्याची शक्यता
दरम्यान, आता राज ठाकरे येत्या 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाला रेल्वेने जाणार आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या मोर्चाची जोमात तयारी केली जात आहे. म्हणूनच हजारो लोक मुंबईत येण्याची शक्यता आहे.
