
आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यात आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता मोठी बामती समोर आली आहे, ती म्हणजे या पत्रकार परिषदेपूर्वीच संतप्त मनसैनिकांनी मनसे स्टाईलने निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले आहेत. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले असताना, निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता. त्याचबरोबर संपूर्ण मतदार संघामधील मतदार याद्या हाताळण्याकरिता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने मनसे कार्यकर्ते यावेळी प्रचंड संतापले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयामधील संगणक फोडले आहेत.
सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मनसे स्टाईल दणका देऊ, मतदार संघातील याद्या अपडेट केल्या नाहीत तर पुन्हा आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत, परंतु निवडणूक आयोग जर कोणाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आम्ही काय करायचं? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच 149 मतदार संघाबाबत येणाऱ्या काळात मनसे कोर्टात पीएल देखील दाखल करणार आहे, अशी माहिती यावेळी मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी दिली आहे.
विरोधकांकडून निवडणूक आयोगावर आरोप
दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला परंतु आधी हा सर्व घोळ दुरूस्त करा अशी मागणी काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.