Weather Updates : पुढले काही दिवस जपून.. या भागांत जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट काय ?

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात (पुणे, रायगड) जोरदार पावसाची शक्यता आहे, तर अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मेघगर्जनेसह विजांचा पाऊस अपेक्षित आहे. पुणेकरांना सतर्कतेच्या सूचना असून, जारकरवाडीत ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Weather Updates : पुढले काही दिवस जपून.. या भागांत जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट काय ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 27, 2026 | 7:37 AM

कडाक्याच्या उन्हात अनेक महिने घालवल्यावर अखेर राज्यात वरूणाराजीची सुखद एंट्री झाली आणि शेतकऱ्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर हसु उमटलं. राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून तो अद्याप स्थिरावतो आहे. त्यामुळे सलग दोन दिवस पाऊस झाल्यावर काल पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र असं असलं तरी आता हवामाना विभागाने पावसाबद्दल मोठी अपडेट दिली असून महाराष्ट्रात लवकरच मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवार, 27 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह विजांसह वादळी पाऊस कोसळू शकतो. तसेच मोठ्या पावसासाठी पुणेकरांनाही तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने काय दिली माहिती ?

उद्यापासून, म्हणजेच रविवारपासून पावसाचे पुनरागमन शक्य आहे. तूर्तास जरी पावसाची पुणे शहरात विश्रांती असली तरी रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो. शहरात दोन दिवस समाधानकारक पाऊस बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस पडला नाही. दोन दिवसांच्या तुलनेत तापमानातही वाढ नोंदवण्यात आले आहे. असे असले तरी, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात मात्र आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

पुण्यासह येत्या काळात रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर येथेही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.

तसेच, ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जारकरवाडीत ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा; उभी पिके, शेती पाण्याखाली

दरम्यान आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीत मान्सूनपूर्व ढगफुटीसदृश पावसाने मोठे नुकसान केले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली असून खरीप हंगामासाठी तयार केलेली शेतीही अनेक ठिकाणी वाहून गेली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळी मुसळधार पावसाने संकट ओढवले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे उभी पिके बाधित झाली असून खरीपपूर्व मशागतीवरही पाणी फिरलं. त्यामुळे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Follow Us