
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती, असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केलं. त्यावर आज संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. “तुम्ही आता ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण बांधला आहे, ते योग्य आहे का? रोज उठून दिल्लीत उठा-बशा काढता, त्या बाळासाहेब ठाकरेंना मान्य आहेत का?. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांनी आत्मचिंतनासाठी कामाख्य मंदिर किंवा अन्य कुठे जायचं असेल तर जावं” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “आपण मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतोय, त्यात किती तथ्य आहे? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणीच बांधली नाही. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, त्यांनी बेईमानी केली” असं संजय राऊत म्हणाले.
मविआमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या मुद्यावर संजय राऊत यांनी काही खुलासे केले. “त्या निर्णयात स्वत: एकनाथ शिंदे सहभागी होते. सामुदायिक निर्णय होता. त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांना कुठलं खातं मिळतं, हे त्यांच्यासाठी महत्त्वाच होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे ज्यूनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार झाला नाही” असं संजय राऊत म्हणाले.
कोणी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनू दिलं नाही?
मविआ तयार करुन सरकार बनवलं पाहिजे ही एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. पत्रकारांनी राऊत यांना विचारलं की, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु नका, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं का?” त्यावर राऊत ‘हो म्हणाले. यात लपवण्यासारखं काय आहे?’ “भाजप बरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. दुसऱ्या कोणाचा प्रश्नच नव्हता. उद्धव ठाकरे या बाबतीत प्रामाणिक आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करुन तसा सिग्नल दिला होता. पण भाजपने शब्द पाळला नाही. म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्यांना मुख्यमंत्री बनू दिलं नाही” असं संजय राऊत म्हणाले.