Sanjay Raut : ईडी आणि सीबीआय आले तर जमालगोटा देऊन 72 तास संडासात बसवू – संजय राऊत
Sanjay Raut : "अमित शाह हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका केली, तर शिंदे सारख्यांना उत्तर देण्याची गरज नाही. शाह यांच्या पक्षाला प्रवक्ते आहेत. तेही उत्तर द्यायला सक्षम आहेत. शाह यांच्यावर टीका केली तर एकनाथ शिंदेंना त्यावर बोलण्याची गरज नाही" असं संजय राऊत म्हणाले.

“अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात. अमित शाह महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात, राज्यातील जनतेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात. अमित शाह देशाचे सहकार मंत्री आहेत. अमित शाह जन्माला आले नव्हते तेव्हापासून महाराष्ट्राचं सहकार देशाला आदर्श आहे” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “पुण्यात वैकुंठलाल मेहता नावाने सहकार संस्था काम करते. ती महाराष्ट्रात आहे. अमित शाह म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं नाही. अमित शाह सहकार मंत्री झल्यापासून राज्यातील सहकाराला घरघर लागली” असं संजय राऊत म्हणाले.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना फोडण्यासाठी अमित शाह यांनी आपल्याकडच्या सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्याचे संचालक, संस्थापक, चेअरमन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. ते सहकार कारखाने बंद करण्यासाठी दबाव आणला. मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या कारखान्यावर धाडी मारल्या. म्हणून कारखाने मोडीत निघाले. अनेक कारखानदारांना दिल्लीत बोलावलं जातं. आणि त्यांच्या कारखान्याच्या लहान सहान चुका सांगून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्यांना भाजपमध्ये घेतलं जातं. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे” असं संजय राऊत म्हणाले.
‘शाह हे व्यापारी आहेत’
“हे काही शरद पवारांनी केलं नाही. धनंजयराव गाडगीळांपासून राज्यात सहकाराचं काम सुरू आहे. पवारांनीही कारखाने जिवंत राहावे म्हणून प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार यांनी सहकार चळवळ जिवंत राहावी म्हणून योगदान दिलं. मिस्टर अमित शाह यांनी दिलं नाही. सहकार क्षेत्रातील बँका कशा लुटल्या जातात ते पाहा. नोटबंदीत गुजरातमधील सहकार बँकेत कसे घोटाळे झाले हे जगाला माहीत आहे. महाराष्ट्रात झालं नाही. विरोधी पक्षाच्या ताब्यातील कारखाने बंद करण्याचं काम शाह यांनी केलं. शाह हे व्यापारी आहेत. व्यापारी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांना सहकाराचं दु:ख कळणार नाही. ते शेअर मार्केटमधील राजकारणी आहेत. सहकार शेयर मार्केट सारखं चालवता येत नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय’
“जमालगोटा ते नक्की कुणाला देणार ते बघू. एक दिवस जमालगोटा शिंदेंना मिळणार आहे. राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय. हे शिंदेंनाही माहीत आहे. हे शिंदेच्या पक्षातीलच असेल. ईडीचा जमालगोटा दिला म्हणून तुम्ही फुटला. आमच्याकडे ईडी आणि सीबीआय आला तर आम्हीही जमालगोटा देऊ आणि 72 तास संडासात बसवू. जमालगोटा आम्हाला सांगू नका. या जमालगोट्याच्या गोळ्या ईडी आणि सीबीआयच्या आहेत. शिंदे गटालाही दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची पोपटपंची सुरू आहे. अमित शाह यांच्या बाजूने. अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आक्रमण केलंय. ते महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे बोलले असतील तर शिंदेंनी बोललं पाहिजे. शिंदेंना जो दिल्लीतून जमालगोटा दिला जात असतो, त्यामुळे शिंदे तोंडाने उलट्या करत आहेत” असं शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
एसटी भाडेवाढीवर संजय राऊत काय म्हणाले?
“हे सरकार गोंधळलेल्या मानिसकतेत आहेत. अर्थमंत्री एका बाजूला. मुख्यमंत्र्यांचं तोंड दुसऱ्या बाजूला. ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांचं हेड क्वॉर्टर दरेगावला आहे. अशा प्रकारे सरकार चाललं आहे. आपआपल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. शिंदे गटाला वाटतं शिंदे त्यांचे मुख्यमंत्री, अजित पवार गटाला वाटतं अजित पवार त्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपला वाटतं फडणवीस त्यांचे मुख्यमंत्री. तीन-तीन मुख्यमंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम करत आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत गोंधळ आहे. देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्या सरकारवर नियंत्रण नाही. नियंत्रण असतं तर दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती” असं संजय राऊत एसटी भाडेवाढीवर बोलताना म्हणाले.
