‘त्या’ बहिणींनाही सरकारचा ‘आधार’, पैसे मिळणार पण थोडे लेट; वाचा A टू Z अपडेट
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काही महिलांना दिलासा दिला आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही, अशा महिलांच्या बँक खात्यातही पैसे जमा होणार आहेत. पण त्या महिलांच्या बँक खात्यात 10 दिवस उशिराने पैसे जमा होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. राज्यातील काही महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यात 9 ऑगस्टला 1 रुपया ट्रायल म्हणून जमा झाला होता. त्याच महिलांच्या बँक खात्यात ट्रायल रन म्हणून योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. या महिलांच्या बँक खात्यात आता 3 हजार रुपये जमा झाले आहेत. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता हा 17 ऑगस्टला जमा होईल, असं जाहीर करण्यात आलं आहे. पण त्यावेळी पैसे पाठवताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी ट्रायल रन म्हणून काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. येत्या 17 तारखेला जवळपास सव्वा कोटी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार होते. पण यापैकी 27 लाख महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक न झाल्याने मोठा पेच सरकारसमोर निर्माण झाला आहे. असं असलं तरी सरकारने यावर मार्ग काढला आहे. सरकारकडून ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक झालेले नाहीत ते लिंक करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सरकारकडून आतापर्यंत कळवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, येत्या 17 तारखेला राज्यातील 1 कोटी 2 लाख महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हफ्ता म्हणजेच 3 हजार रुपये जमा होणार आहेत.
‘त्या’ बहिणींनाही सरकारचा ‘आधार’
राज्य सरकारकडून योजना जाहीर झाली तेव्हाच महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असावे, असं सूचित करण्यात आलं होतं. पण तरीदेखील काही कारणास्तव महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक होऊ शकले नाहीत. असं असलं तरी राज्य सरकारने या महिलांचे अर्ज बाद न करता त्या महिलांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार अशा 27 लाख महिलांच्या बँक खात्यासोबत आधारक्रमांक लिंक करणार आहे. तसेच 17 ऑगस्टनंतर दहा दिवसांनी या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
31 ऑगस्टची मुदत अंतिम नाही
लाडक बहीण योजनेबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. पण आता ही मुदत अंतिम असणार नाही. याचाच अर्थ 31 ऑगस्टनंतरही लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची प्रक्रिया पुढचे काही दिवसही चालूच राहणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार आहे. 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना पहिला हफ्ता 17 ऑगस्टला मिळणार आहे. त्यानंतर 10 दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही पहिला हफ्ता मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असं आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी केलं आहे.
