
आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला मतदान होईल. देशातील सर्वात श्रीमत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर विजयाचा भगवा फडकवण्यासाठी सर्वच पक्ष उत्सुक असून महायुतीने तर त्यासाठी अगदी कंबर कसून तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही दिवस बाकी असून आज भाजप- शिवसेना शिंदे गट, महायुतीचा जाहीरनामा अर्थात वचननामा प्रकाशित करण्यात आला . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis )आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे सांगत मुंबईकरांसाठी पुढचा काळ कसा असेल तेही नमूद केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली. मुंबईला बांगलादेशी आणि रोहंग्यांपासून मुक्त करू असे सांगत वर्षभरात बांगलादेशी शोधून काढू आणि त्यांना पाठवून देऊ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुंबईला बांगलादेशी आणि रोहिंग्यांपासून मुक्त करू. वर्षभरात बांगलादेशी शोधून काढू आणि त्यांना पाठवून देऊ. आयआयटीच्या माध्यमातून टूल तयार करून बांगलादेशी शोधू असं ते म्हणाले. पश्चिम बंगालमधून येतात. कागदपत्र तयार करून ते मुंबईत येतात, इथे राहतात. ते बरेचसे आपल्यासारखे दिसतात, भाषा बोलतात त्यामुळे त्यांना हुडकावं लागतं. यासाठीच आपण एक टुल तयार करत आहोत. यासंदर्भात काम सुरू केलं असून सहा महिन्यात ते टुल तयार होईल. त्यामुळे बांगलादेशी नागरिक शोधणं सोपं होईल. १०० टक्के बांगलादेशी शोधून त्यांना बांगलादेशला पाठवू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं.
लाडक्या बहिणींसाठीही मोठी घोषणा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठीही मोठी घोषणा केली. मुंबईतील लाडक्या बहिणींना महापालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं, शिलाई मशीन दिलं. आता त्याच्या पलिकडे जाऊन लाडक्या बहिणींना लघुउद्योगासाठी लोन देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.गेल्या वेळी त्यांना 1 लाखापर्यंत लोन दिलं. आता मुंबईच्या लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहोत अशी घोषणा करत लाडक्या बहिणींकडून लखपती दिदीकडे त्यांचा प्रवास करू असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
या महापालिकेत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणायची आहे. बिल्डिंग प्लानमध्ये एआयचा वापर करू. डीसीआर आणि डीपी आणि जिओ स्पेशल डेटाचा वापर करून एआयचं मॉडेलच सांगेल काय चूक आहे, काय बदल केला पाहिजे हे सांगणार आहे असंही ते म्हणाले.