मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच मोठा अडथळा, नितीन गडकरींकडे केल्या 4 महत्त्वाच्या मागण्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, मंत्री भरत गोगावले यांनी महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थानिक वाहतुकीसाठी कोलाड अंडरपास, महाड शहरासाठी सेवा रस्ता आणि माणगाव तालुक्यातील गावांसाठी सलग सेवा रस्ता अशा चार प्रमुख मागण्यांचे साकडे घातले.

मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वास जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत हा महामार्ग येत्या एप्रिल अखेरीस पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चार महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्ग हा कोकणची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो. या महामार्गाचे काम दर्जेदार व सुरक्षित व्हावे, तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना एक विस्तृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात प्रामुख्याने सुरक्षितता आणि स्थानिक वाहतुकीच्या सोयीसाठी चार महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
मागण्या काय?
1. कोलाड येथे सुरक्षित अंडरपासची उभारणी
रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे महामार्गावर सुरक्षित अंडरपास तातडीने बांधण्यात यावा. कोलाड हे स्थानक अत्यंत वर्दळीचे असून तेथे अंडरपास नसल्यामुळे महामार्ग ओलांडताना स्थानिक नागरिक आणि वाहनांना मोठा धोका पत्करावा लागतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा अंडरपास आवश्यक आहे.
2. महाड शहरासाठी सेवा रस्ता (गांधारपाळे ते साहिलनगर)
महाड शहराच्या हद्दीत गांधारपाळे ते साहिलनगर या दरम्यान स्वतंत्र सेवा रस्ता विकसित करण्यात यावा. सध्या महाड शहरातून जाणारी स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहने यांच्यात स्पष्ट विभागणी नाही. यामुळे वारंवार अपघात होतात आणि शहरांतर्गत वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. स्वतंत्र सेवा रस्ता झाल्यास शहरातील स्थानिक वाहतूक सुरळीत होईल आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक सुरक्षितपणे पुढे जाईल, ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होईल.
3. वीर गाव व टोल नाका परिसरात सर्व्हिस रोड
मुंबई-गोवा महामार्गावरील वीर गाव आणि टोल नाका परिसरामध्येदेखील सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) उपलब्ध करून देण्यात यावा. टोल नाक्यावर तसेच वीर गावाजवळ स्थानिक नागरिकांना महामार्गावर न उतरता ये-जा करण्यासाठी आणि टोल नाक्याजवळील वाहतूक व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी हा सर्व्हिस रोड महत्त्वाचा आहे.
4. माणगाव तालुक्यातील गावांसाठी सलग सेवा रस्ता
माणगाव तालुक्यातील पहेल, खांडपाळे, लाखपाळे ते वडपाळे या गावांच्या हद्दीत सलग सेवा रस्ता तातडीने बनवून मिळावा. या गावांच्या परिसरात सलग सेवा रस्ता नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना थेट महामार्गावर उतरावे लागते, ज्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. हा अपघात टाळण्यासाठी आणि शेती व वस्तीतील नागरिकांना सुरक्षितरित्या महामार्ग ओलांडण्यासाठी या संपूर्ण पट्ट्यात सलग सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे.
मंत्री भरत गोगावले यांनी हे निवेदन देऊन केवळ महामार्गाचे काम पूर्ण होण्याची मागणी केलेली नाही. तर या महामार्गामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेवर होणाऱ्या परिणामांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. कोकणातील रहिवाशांसाठी सुरक्षित, अखंड आणि सुविधाजनक महामार्ग तयार होणे आवश्यक आहे. नितीन गडकरी यांनी दिलेले एप्रिल अखेरचे आश्वासन पूर्ण व्हावे, तसेच या मागण्यांचा त्वरित विचार व्हावा, अशी अपेक्षा कोकणवासियांकडून व्यक्त केली जात आहे.
