
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती व देखभाल कामांसाठी रविवार 25 जानेवारी 2026 रोजी विविध उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक
मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून 10.36 ते 15.10 दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा स्थानकावरून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान सर्व नियोजित थांब्यांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर सुमारे 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील लोकल मुलुंड स्थानकावरून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, ठाणे येथून 11.03 ते 15.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड स्थानकावरून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व थांब्यांवर थांबतील आणि नंतर माटुंगा स्थानकावरून पुन्हा जलद मार्गावर जातील. परिणामी या सेवाही सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावरील सेवांवर मोठा परिणाम
हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी / बांद्रा (डाउन) दरम्यान 11.40 ते 16.40, तसेच चुनाभट्टी / बांद्रा ते CSMT (अप) दरम्यान 11.10 ते 16.10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. या काळात, CSMT येथून 11.16 ते 16.47 दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर सेवा, तसेच 10.48 ते 16.43 दरम्यान बांद्रा / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील.
याशिवाय, पनवेल / बेलापूर / वाशी येथून 9.53 ते 15.20 दरम्यान CSMT कडे जाणाऱ्या अप सेवा, तसेच गोरेगाव / बांद्रा येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 दरम्यान CSMT कडे जाणाऱ्या अप सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.