
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या सभा सुरू आहेत. आज मुंबईमध्ये महायुतीची सभा पार पडली, या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या सभेत ठाकरे बंधूंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती आरोप केले होते, या आरोपांना आता एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोस्टल रोडचं भूमीपूजन लपून छपून केलं. ज्या मुख्यमंत्र्यांनी जे घडून आणलं त्यांनाही तुम्ही बोलावलं नाही. एवढा कद्रूपणा केला, असा थेट हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
आता ४० मिनिटात विरारला जाता येईल. गेमचेंजर प्रकल्प आहे. मेट्रोच्या कामाला दिलेली स्थगिती उठवली आहे. लाखो लोक प्रवास करत आहेत. भुयारी रस्ते होत आहेत. वाहतुकीवरचा ताण कमी होत आहे. एमएमआर क्षेत्रात कनेक्टव्हिटी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. काही मिनिटात मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचता येईल असं हे जाळं तयार करत आहोत. आम्ही मुंबईला जोडतोय. आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. त्यामुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचेल. याला म्हणतात विकास. प्रवासाचा त्रास घराबाहेर पडणाऱ्यांनाच कळतो. घरात बसणाऱ्यांना कसा कळेल, अशी टोलेबाजी देखील यावेळी शिंदे यांनी केली आहे.
मोदींनी महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले. तुमच्या राज्यात काहीच मिळालं नाही. तुम्ही कधी मागायला गेला नाहीत. इतका इगो होता. त्याच मोदींवर आता टीका करत आहात. अयोध्येत राम मंदिर बांधलं. ३७० कलम रद्द केलं. त्यांना तुम्ही शिव्या देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची. १० वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येत आहे. दावोसला मुख्यमंत्री जाणार आहेत, त्यामुळे मोठी गुंतवणूक येणार आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.