
सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमधील जवळीकता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठींचे सत्र सातत्याने सुरु आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे-ठाकरे गट अशी युती होणार का, असा प्रश्न सातत्याने केला जात आहे. आता यावर भाजपने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या भेटीचा आगामी निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंच्या भेटीचा निवडणुकीवर अजिबात परिणाम होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट जनाधार दिला आहे. मुंबईत महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. मुंबई झपाट्याने बदलत आहे. मेट्रो रेल आणि कोस्टल रोड प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईत मोठी प्रगती होत असून, मुंबईचा चेहरा बदलत आहे. ठाकरे यांना लोकांनी ३०-३५ वर्षे पाहिले आहे, पण त्यांनी ना बाळासाहेबांची विचारसरणी जोपासली, ना मुंबई आणि मराठी माणसावर त्यांचे प्रेम राहिले, असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटींवर बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचे नाही, असे विधान केले. मला आश्चर्य वाटतं. तसं काय युती, आघाडी महाराष्ट्रात कधी झालीच नाही. दोन भाऊ असणे स्वाभाविक आहे. दोन पक्ष आणि दोन नेते आहेत. ही लोकशाहीत असणारी प्रक्रिया आहे. महायुतीत पण तीन आणि महाविकास आघाडीत पण तीन पक्ष आहेत, यात वेगळं काय घडत आहे? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. गेले २० वर्षे झालं कुटुंब एकत्र नव्हतं ते जर एकत्र आले, तर राजकीय दृष्ट्या त्याचा काडीचाही परिणाम होणार नाही,” असे ठाम मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.