‘गरीब नवाज’च्या तीन मजली… चार मजली झोपड्या… थेट बुलडोझर फिरवला; वांद्रे स्टेशनबाहेर 1000 पोलीस तैनात

वांद्रे पूर्वेकडील रेल्वे स्टेशनबाहेर गरीब नगर येथील तीन-चार मजली अनधिकृत झोपड्यांवर आज बुलडोझर फिरवण्यात आला. रेल्वेच्या जागेवरील हे अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटवण्यात आले. नवीन रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.

गरीब नवाजच्या तीन मजली... चार मजली झोपड्या... थेट बुलडोझर फिरवला; वांद्रे स्टेशनबाहेर 1000 पोलीस तैनात
वांद्रे पूर्वेकडील स्टेशनबाहेरच्या झोपड्यांवार तोडक कारवाई करण्यात आली
| Updated on: May 19, 2026 | 2:35 PM

वांद्रे पूर्वेकडील स्टेशनबाहेरच्या गरीब नवाज झोपडपट्टीवर असलेल्या झोपड्यांवार आज तोडक कारवाई करण्यात आली. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या झोपड्या तीन मजली, चार मजली होत्या. काही दुमजली होत्या. म्हणजे या झोपड्या मिनी इमारतच होत्या. हे बांधकामही अनधिकृत होतं. त्यामुळे या सर्व झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते.

वांद्रे पूर्व रेल्वे परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाने आज सकाळीच मोठी कारवाई सुरू केली. रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम करण्यात आले. अजूनही हे पाडकाम सुरू आहे. अनेकदा सांगूनही इथले रहिवाशी जात नव्हते. अनेकदा नोटीसा बजावल्यानंतरही झोपड्या जैसे थे असल्याने आज अखेर या झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

सहा बुलडोझर…

रेल्वे परिसरात बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या हटवण्यासाठी 6 बुलडोझर आणण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच रेल्वेने ही कारवाई केली आहे. हा भाग मोकळा झाल्यावर त्या ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जातं.

कोर्टाच्या आदेशानेच…

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. RPF, GRP आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात सज्ज ठेवण्यात आला होता. कारवाईदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील दोन पूल बंद करण्यात आले होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विनीत अभिषेक यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, “उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानुसार अतिक्रमण हटवले जात आहे. रेल्वेला चालना देण्यासाठी नवीन मार्ग टाकणे गरजेचे असून त्यासाठी जमीन मोकळी करावी लागेल.” सध्या पाडकाम सुरू असून, ही मोहीम लोकांच्या सहकार्याने राबवली जात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

 

दोन दिवस पाडकाम

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगरमध्ये रेल्वे स्थानकाच्या परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे दोन दिवस ही मोहीम राबवणार आहे. रेल्वे आजपासून अनेक वर्षांपासून झालेले हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू केले आहे. रेल्वेच्या कारवाईपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दिवसभरात 140 झोपड्या पाडण्यात येणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर सकाळी रेल्वेच्या कारवाईपूर्वीच, बेकायदेशीरपणे बांधलेल्या या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी आपली घरे रिकामी केली होती.

लोक भडकले

दरम्यान, रेल्वेच्या कारवाईवर स्थानिक लोक भडकले आहेत. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगरमधील रहिवाशांचे म्हणणे आहे की, आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही आणि १४० घरे पाडण्यात येणार आहेत. आम्हाला घराच्या बदल्यात दुसरे घर हवे आहे.

Follow Us