शिमग्याआधी कोकणी माणसासाठी गुड न्यूज, फडणवीस सरकारची मोठी घोषणा काय ?

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. मुंबई ते विजयदुर्ग अशी M2M फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील गर्दी टाळून अवघ्या ७ तासांत समुद्रमार्गे कोकणात पोहोचता येईल. मंत्री नितेश राणे यांनी वेळापत्रक जाहीर केले असून, यामुळे कोकणवासियांचा शिमग्याचा प्रवास सुखकर होणार आहे.

शिमग्याआधी कोकणी माणसासाठी गुड न्यूज, फडणवीस सरकारची मोठी घोषणा काय ?
शिमग्याआधी कोकणावासियांसाठी गुड न्यूज
| Updated on: Feb 21, 2026 | 8:15 AM

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा वेगळाच उत्साह असतो. तसेच कोकणातील सर्वांसाठीही होळी आणि शिमग्याचं अनोखं महत्व आहे. या शिमगोत्सवासाठी मुंबईतून अनेक कोकणवासीय आपल्या गावी, घरी नेमाने जात असतात. त्यासाठी रेल्वे बूकिंग, गर्दी, रोडवर वाहनांच्या रांगा अशा अनेक अडचणी पार करत, मजल दरमजल करत कोकणवासीय शिमग्याल घरी येतात. मात्र आता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, शिमग्याआधी कोकणी माणसासाठी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. शिमग्याला आता बोटीने जाता येणार आहे, त्यामुळे कोकणवासीयांच्या आनंदात भर पडली असून त्यांना आनंदात, सर्व नातेवाईकांसह सण साजरा करता येणार आहे.

येत्या 1 तारखेपासून, म्हणजेच 1 मार्चपासून समुद्रामार्गे तळकोकणात जाता येणार आहे. त्यासाठी एम टू एम फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार, 1 मार्चपासून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग या फेरीस सुरूवात होणार आहे. स्वत: मंत्री नितेश राणे, हे देखील पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करणार आहेत. त्यामुळे मुंबईहून अवघ्या काही तासांत कोकणात जाता येणार आहे. अवघ्या सात तासांमध्ये मुंबईतून विजयदुर्ग गाठता येणार आहे.

कसं असेल वेळापत्रक ?

1 मार्च –
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

2 मार्च –
विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

4 मार्च –
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

5 मार्च –
विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

7 मार्च –
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.

8 मार्च
विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.

रेल्वेच्या विशेष फेऱ्या

यंदाच्या उत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील इतर भाग आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई-सावंतवाडी, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर अशा महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. होळी विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील. या गाड्या केवळ होळीच्या सणांपुरत्या मर्यादित असतील. तर नियमित विशेष गाड्यांच्या ९४ फेऱ्या असतील.