
11 Lakh Duplicate Voters in Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच मतदारांचा मोठा घोळ समोर आला आहे. मुंबईतील मतदार यादीत 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. एका व्यक्तीचे नाव तर मतदार यादीत 103 वेळा आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. महापालिकेने मतदार यादी शुद्धी मोहिम राबवण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. या नवीन अपडेटमुळे गेल्या महिन्यात ‘सत्याचा मोर्चा’ योग्य कारणासाठी काढण्यात आला होता, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर काही जण हा या मोर्चाचाच परिणाम असल्याचा दावा करत आहेत.
4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे अनेकदा
केवळ एका व्यक्तीचे नाव 103 वेळा आलेले नाही तर अजून एक मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे अनेकदा मतदार यादीत घुसवण्यात आलेली आहे. हा आकडा धक्कादायक आहे. एकापेक्षा अधिक वेळा या व्यक्तींची नावे मतदार यादीत सापडली आहेत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने अगोदरच मतदार याद्यांच्या शुद्धीसाठी वेळ मागून घेण्यासाठी युक्तीवाद का केला नाही, असा सवालही विचारल्या जात आहे. आयोगाच्या या भूमिकेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बोगस मतदारांना हटवण्यासाठी मोहिम
एखाद्या व्यक्तीची कितीवेळा मतदार यादीत नोंदणी झाली हे सविस्तर समोर आलेले नाही. वांगणीदाखल काही, नमुना म्हणून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे अनेकदा आल्याचे समोर आले. पण एकूण 11 लाख मतदारांचे दुबार नावं समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुबार नावं शोधणं आणि ती मतदार यादी बाहेर काढणं हे मोठं आव्हान आहे. दुबार मतदारांची नावं कमी करण्यासाठी 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मोहिम राबवली जाणार असल्याचे समोर येत आहे.
विरोधकांच्या दाव्यात दम
मुंबईत उद्धव सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, डावे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळाविरोधात आणि मत चोरीविरोधात मुंबईत सत्याचा मोर्चा काढला होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. या मोर्चानंतर शिंदेसेना, राष्ट्रवादीच नाही तर भाजपमधील अनेक नेत्यांनी सुद्धा मतदार यादीच्या शुद्धीची मागणी केली होती. दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी BMC ने डुप्लिकेट नावाविषयी सूचना दिल्याचे आणि त्याआधारे 5 डिसेंबरपर्यंत कालवधी वाढून देण्यावर विचार सुरु असल्याची माहिती दिली. आयोगाने हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीचा मुद्दा समोर आणला. धारावीतील मतदारांना मुद्दाम दुसऱ्या वार्डमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ते पोलिंग बुथपर्यंत, मतदान केंद्रापर्यंत पोहचू नयेत यासाठी असे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.