मातोश्री-2 बांधून तयार, ठाकरे कुटुंबाच्या 8 मजली घराची खास वैशिष्ट्ये

| Updated on: Dec 01, 2019 | 12:09 AM

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत सुचक इशारा दिला आहे.

मातोश्री-2 बांधून तयार, ठाकरे कुटुंबाच्या 8 मजली घराची खास वैशिष्ट्ये
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे नेमके कोठे राहणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत सुचक इशारा दिला आहे. सध्या ठाकरे कुटुंब मातोश्रीतच वास्तव्याला आहे. या मातोश्री इमारतीच्या समोरच आता मातोश्री-2 ची भव्य इमारत बांधून तयार झाली आहे (Matoshri 2 building construction completed). ही मातोश्री-2 ची इमारत 8 मजली आहे. मुंबईतील बांद्रा-कलानगर भागातील महत्त्वाच्या ठिकाणी या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं (Matoshri 2 building construction completed).

आतापर्यंत ठाकरे कुटुंब राहत असलेल्या तीन मजली इमारतीला मातोश्री या नावाने ओळखलं जातं. मागील जवळपास चार दशकांपासून हे घर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आलं आहे. सध्या हे ठिकाण राजकारणाच्या थेट केंद्रस्थानी आले आहे. राज्याच्या कारभाराची सुत्रे देखील आता वर्षा बंगल्याऐवजी मातोश्रीवरुन हलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 70 च्या दशकात हे घर बांधलं होतं. या ठिकाणी देशातील अनेक दिग्गज नेते येऊन गेलेले आहेत. अन्य क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर व्यक्ती देखील येथे पाहुणे म्हणून येऊन गेले.

जुन्या मातोश्री इमारतीच्या जवळच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नवी 8 मजली मातोश्रीची-2 ची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. अजूनपर्यंत ठाकरे कुटुंबीय या नव्या घरात राहण्यासाठी गेलेले नाहीत. लवकरच ठाकरे कुटुंब या नव्या इमारतीत राहण्यासाठी जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ही 8 मजली इमारत एकूण 10 हजार स्‍क्‍वेअर फूट क्षेत्रात बांधण्यात आली आहे. या इमारतीत 3 ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत. 5 बेडरुम, स्टडी रुम, होम थिएटर, स्विमिंग पूल, हायटेक जिम आणि भव्य हॉल असं या इमरातीचं स्वरुप आहे. मातोश्री-2 ला दोन प्रवेशद्वार असणार आहेत. एक प्रवेशद्वार कलानगरच्या बाजूने असेल, तर दुसरे बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असेल.

मातोश्री-2 च्या आतील सज्जा आणि फर्निचरचं काम पूर्ण होण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल असंही सांगितलं जात आहे. मातोश्री 2 बांधले ती जमीन 2016 मध्ये 11 कोटी 60 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली आहे.