Sharad Pawar: शरद पवार यांचा रुग्णालयातील फोटो समोर येताच आतापर्यंत हे नेते गेले भेटून
Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी अनेक नेते येत आहेत. काहींनी त्यांना फोन केला आहे.

Sharad Pawar in Breach Candy Hospital: सोलापूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना शरद पवार यांची तब्येत बिघडली. 1 नोव्हेंबर रोजी ते पंढरपूर तालुक्यातील दुधाळी सोलापूर आणि नंतर पुढे भूम-परंडा तालुक्याला भेट देणार होते. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कफ आणि छातीत दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. पुढील चाचण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले. इथे त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते येत आहेत. तर काहींनी त्यांच्या तब्येतीची फोनवरून विचारपूस केली आहे.
या नेत्यांनी घेतली भेट
शरद पवार यांना भेटण्यासाठी गुरूवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जुने सहकारी प्रफुल्ल पटेल पोहचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास विविध विषयांवर चर्चा झाली. भेटीदरम्यान शरद पवार यांनी पटेल यांना १० तारखेनंतर आपण एकत्र बसू असा संदेश दिल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा त्यांना काल भेटले. तर रुग्णालयातील व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार या सुद्धा पवारांच्या भेटीला रुग्णालयात जाणार आहेत. तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार, उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा थोड्याचवेळात ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
दरम्यान उद्योगतपती गौतम अदानी यांनी सुद्धा ब्रीच कँडी जवळ करत शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गेल्यावेळी बारामतीत इथं एआय सेंटरचे अदानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालय गाठले. त्यांनी पवारांची भेट घेतली.
तब्येतीची काळजी घ्या
तर 4 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला. “तुम्ही इतकी वर्षे देशाला मार्गदर्शन केले. आता सुप्रिया सुळे आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या आणि आशीर्वाद द्या.” असे मोदी पवारांशी बोलताना म्हणाले. रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोदी यांनी पवारांना संपर्क केला होता.
तर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवारांना फोन करून त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. खासदार संजय राऊत हे थोड्याच वेळात पवारांना भेटायला ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सु्द्धा शरद पवार यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी सुद्धा पवारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतरही काही नेते आज रुग्णालयात त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.