Aaditya Thackeray Ayodhya: ठरलं! आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्येला जाणार; संजय राऊत यांची मोठी घोषणा

| Updated on: May 08, 2022 | 10:36 AM

Aaditya Thackeray Ayodhya: अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. जोरात स्वागत केलं जाणार आहे.

Aaditya Thackeray Ayodhya: ठरलं! आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्येला जाणार; संजय राऊत यांची मोठी घोषणा
आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्येला जाणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) येत्या 10 जून रोजी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. जवळपास 10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील हिंदू अयोध्येत दाखल होतील. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील हिंदूंनीही आम्हा अयोध्या भेटीचं निमंत्रण दिलं आहे. अस्सल हिंदुत्वाचं त्यांना स्वागत करायचं आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच आमचा दौरा राजकीय नाही. आम्ही एका श्रद्धेतून अयोध्येला जाणार आहोत. भक्तीभावाने अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो. राजकीय हेतून गेल्यावर राम कधीच आशीर्वाद देत नाही, असा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. जोरात स्वागत केलं जाणार आहे. अयोध्येत कोण जातं, कोण नाही काहीही फरक पडत नाही. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. ते सर्वांना आशीर्वाद देतात. पण कोणी राजकीय कारणाने जात असेल किंवा कुणाला तरी कमी लेखण्यासाठी जात असेल तर आशीर्वाद मिळत नाहीत. तिथे विरोध होतो. उद्धव ठाकरे आम्ही सर्व आंदोलनात होतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येत गेले होते. आता आदित्य ठाकरे जाणार आहेत. 10 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येत जातील. 10 जूनची तारीख जवळपास फिक्स झाली आहे. आदित्य ठाकरेंसोबत सर्व शिवसैनिक जाणार आहेत. दर्शन घेणार आहेत. आशीर्वाद घेणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हा त्यांचा प्रश्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातूनच विरोध होत आहे. त्यावर बोलण्यास राऊत यांनी नकार दिला. कोणी विरोध करत असेल, का विरोध करतात हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्याचं काही पडलं नाही. आमचं अयोध्येत जाणं काही राजकीय जाणं नाही. श्रद्धा आणि भक्तीभावापोटी आम्ही जात आहोत, असंही ते म्हणाले.

अस्सल हिंदुत्वाचं स्वागत होणार

अयोध्या दौऱ्याची आम्हीच तयारी करत आहोत असं नाही. उत्तर प्रदेश अयोध्येतून हजारो लोकांनी आम्हाला निमंत्रण दिलं आहे. अस्सल हिंदुत्वाचं आम्ही वारंवार स्वागत केलं आहे. त्या स्वागताची आम्हाला संधी द्या, असं या लोकांनी म्हटलं आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

ठाकरे कधी दबावाखाली काम करत नाही

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याकडे राऊत यांचं लक्ष वेधलं असता, तक्रारीत काही ताकद असेल, आम्ही चुकीचं काही केलं असेल तर देशातील प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. ठाकरे कधी दबावाखाली काम करत नाहीत. किंबहुना ठाकरेंचा दबाव असतो हा इतिहास आहे, असंही ते म्हणाले.